केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे सार्क परिषदेसाठी पाकिस्तानला जाणार आहेत. ३ आणि ४ ऑगस्ट रोजी ही परिषद होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार राजनाथ सिंह हे या परिषदेत सीमेवर होणा-या दहशतवादी हल्ल्यांचा मुददा उपस्थित करणार आहे.
हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हान वाणीला ठार मारल्यानंतर पाकिस्तानमध्ये काळा दिवस पाळण्यात आला होता. यावेळी काश्मीरमधल्या हिंसाचारामागे पाकिस्तान आहे, असे राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत सांगितले होते. काश्मिरचा प्रश्न सोडवण्यासाठी भारत समर्थ आहे तेव्हा भारताच्या प्रश्नात तिस-या देशाने नाक न खुपसण्याचे आवाहन देखील राजनाथ सिंह यांनी केले होते. काश्मीरमधील ताज्या अशांततेला चिथावणी देण्यात पाकिस्तानने ‘प्रमुख भूमिका’ बजावली असून हा देश भारतातील दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे पाकिस्तानचे हे ना पाक इरादे राजनाथ सिंह हे सार्कमध्ये मांडणार आहेत.
गृहमंत्र्यांची पहिली सार्क बैठक ११ मे २००६ रोजी झाली होती, त्यानंतर दुसरी बैठक २००७ साली नवी दिल्ली येथे घेण्यात आली. माणुसकीला धोका असणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचे मूळ नष्ट करण्यासाठी या बैठकीत प्रयत्न केले जातात.