नवी दिल्ली : राज्यसभेच्या सभागृहात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) जवान तैनात केल्याच्या विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या आरोपांनंतर मंगळवारी प्रचंड गदारोळ झाला. सभागृहात जवान आणून विरोधकांची गळचेपी करत असल्याच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. त्यातच, ‘‘हे सदन तुम्ही चालवत आहात की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,’’ असा प्रश्न उपसभापतींना करून खरगेंनी संसदेच्या स्वायत्ततेवरच बोट ठेवले.
सभागृहामध्ये ‘सीआयएसएफ’चे जवान तैनात केल्याचा आरोप उपसभापती हरिवंश, सभागृहाचे नेते जे. पी. नड्डा तसेच केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. हे ‘सीआयएसएफ’चे जवान नसून संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील मार्शल होते. सभापती वा पीठासीन अधिकाऱ्यांला गरज असेल तेव्हा मार्शलना सभागृहात बोलावण्याचा अधिकार आहे, असे हरिवंश यांनी स्पष्ट केले. खरगेंनी चुकीचा आरोप केला असून नियंमभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईही केली जाऊ शकते, असा मुद्दा रिजिजू यांनी मांडला. मात्र, ‘सीआयएसएफ’चे जवान सभागृहात तैनात केले गेले, असे सांगत खरगेंनी आरोप मागे घेण्यास नकार दिला.
राज्यसभेमध्ये गेल्या शुक्रवारी ‘एसआयआर’च्या विषयावर चर्चा करण्याची मागणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी केली होती. त्यावरून इंडिया आघाडीचे सदस्य सभापतींच्या समोरील जागेवर येऊन घोषणाबाजी करत होते. विरोधकांना अडवण्यासाठी उपसभापतींनी मार्शलना सभागृहात सुरक्षेसाठी तैनात केले. हे मार्शल संसदेच्या सुरक्षा यंत्रणेतील नसून ‘सीआयएसएफ’चे जवानच होते, असे खरगेंचे म्हणणे होते. सभागृहात विरोधकांना मुद्दा उपस्थित करण्याचा अधिकार असताना मार्शल कशासाठी तैनात केले, असा प्रश्न खरगेंनी केला. ‘सीआयएसएफ’चे जवान तैनात करण्यावर खरगेंनी आक्षेप घेत उपसभापतींना पत्रही लिहिले होते. त्यावर उपसभापती हरिवंश यांनी मंगळवारी तीव्र आक्षेप घेतला.
माझी शिकवणी लावा! नड्डा
राज्यसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनीही सभागृहात गोंधळ घालणे हा लोकशाहीचाच एक प्रकार असल्याचे सांगितले होते. आता मात्र सत्ताधारी भाजपला विरोधकांनी गोंधळ घालणे लोकशाहीविरोधी वाटू लागले आहे, असा मुद्दा खरगेंनी मांडला. त्यावर, ‘‘गोंधळ घालण्याचेही वेगवेगळे प्रकार असतात. विरोध कसा करायचा हे माझ्याकडून शिका. मी ४० वर्षे विरोधी पक्षात राहिलो आहे, त्यामुळे तुम्ही माझी शिकवणी लावा. आत्ता तर आम्ही सत्तेत येऊन १०-११ वर्षे झाली आहेत. तुम्ही अजून ३०-४० वर्षे विरोधी बाकांवरच बसणार आहात,’’ असा आक्रमक प्रतिवाद करत सभागृहाचे नेते जे. पी. नड्डा यांनी हरिवंश यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला.
विरोधी पक्ष लोकशाही पद्धतीने निदर्शने करत आहेत आणि आम्ही तसे करत राहू. सभागृहामध्ये ‘सीआयएसएफ’ आणले जात आहेत. आम्ही दहशतवादी आहोत का? – मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते, राज्यसभा
त्यामुळे सभागृहात सैन्याला आणले जाईल. ‘सीआयएसएफ’चे जवान, दिल्ली पोलिसांना आणले जाईल असे म्हणणे चुकीचे आहे. खरगे देशाची दिशाभूल करत आहेत. – किरेन रिजिजू, संसदीय कामकाजमंत्री