Jal Samadhi to Satyendra Das: अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. गुरुवारी आचार्य सत्येंद्र दास यांच्या पार्थिवाला शरयू नदीत जल समाधी देण्यात आली. तुळशीघाट येथे होडीतून नदीपात्रात गेल्यानंतर तिथे सत्येंद्र दास यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्याआधी त्यांचे पार्थिव अयोध्या नगरीत फिरवले गेले. सनातन धर्मात दहन करून अंत्य संस्कार केले जात असतात. मात्र उत्तरेत महंत आणि साधूंना मृत्यूपश्चात दहन न करता त्यांना जल समाधी दिली जाते. यामागचे कारण जाणून घेऊ या.

साधू-संतांना मृत्यूनंतर जल समाधी देण्याची प्रथा सनातन धर्मात अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. या प्रथेनुसार पार्थिवाला नदीच्या प्रवाहात सोडण्यात येते. या प्रथेमागे धार्मिक, आध्यात्मिक आणि इतर कारणे असल्याचे सांगितले जाते.

आध्यात्मिक कारण काय?

मोक्ष प्राप्तीसाठी ही प्रथा सुरू झाल्याचे सांगितले जाते. जल समाधीच्या माध्यमातून आत्म्याला लवकर मोक्ष मिळतो. कारण पाण्याला पवित्र आणि शूद्ध तत्व मानले जाते.

काही धार्मिक मान्यतेनुसार मानवी शरीर पंचतत्वांनी तयार झाले आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही ती पाच तत्वे आहेत. मृत शरीराला जल समाधी दिल्यामुळे ते आपल्या मूळ तत्वात परतले, अशी धारणा आहे.

तसेच संन्यासी जीवन जगणाऱ्या साधू-संताचे शरीर आयुष्यभर तप, साधना केल्यामुळे परिपूर्ण झाले असल्याचे मानले जाते. यासाठी त्यांच्या पार्थिवाचे दहन करण्याऐवजी त्याला जल समाधी दिली जाते.

विशेष नद्यांमध्ये जल समाधी

धार्मिक प्रथेनुसार, भारतातील गंगा, नर्मदा, सरस्वती, गोदावरी यासांरख्या पवित्र नद्यांमध्ये जलसमाधी दिल्यास साधू-संतांमधील दिव्य ऊर्जा संपूर्ण जगात पाण्याच्या प्रवाहाद्वारे पसरेल, असेही मानले जाते.

उत्तर भारतातील अनेक आखाडे आणि मठातील साधू-संतांवर दहन संस्कार केले जात नाहीत. त्याऐवजी त्यांचे पार्थिव नदी पात्रात सोडले जाते. यातून पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, अशी एक धारणा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुणाला दिली जाते जल समाधी?

सामान्यतः निर्वाण प्राप्त संन्यासी, नागा साधू, आखाड्यांचे प्रमुख महंत किंवा आयुष्यभर ज्यांनी कठोर तप केले अशांना जल समाधी दिली जाते.