Ayodhya Ram Mandir Opening Ceremony : अयोध्यानगरीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी आपले विचार प्रकट केले. “प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर तर बनले, आता पुढे काय? शतकांपासूनची प्रतिक्षा तर संपली, आता पुढे काय?”, असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला आणि पुढील हजार वर्ष भारतावर परिणाम टाकेल, असे कार्य आता करायचे आहे, असे सुतोवाच त्यांनी केले.

“आज या शुभ प्रसंगी ज्या दैवी शक्ती आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत, आपल्याला पाहत आहेत. त्यांना आपण असाच निरोप द्यायचा का? आज मी पवित्र मनाने अनुभूती घेत आहे की, कालचक्र बदलत आहे. आमच्या पिढीला एका विशेष कामासाठी निवडले गेले आहे. हजार वर्षांनंतरची पिढी राष्ट्रनिर्माणाच्या आजच्या कामांचे स्मरण करेल. म्हणून मी सांगतो, हीच ती वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे. आम्हाला आजपासून पुढच्या हजारो वर्षांच्या भारताचा पाया रचायचा आहे. मंदिर निर्माणाच्या पुढे जाऊन सर्व नागरिकांनी समर्थ, सक्षम, भव्य-दिव्य भारत निर्माणाची शपथ घेऊया”, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

Ram Mandir Ayodhya Inauguration Live: मी आज प्रभू श्रीराम यांची माफी मागतो, कारण…- नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “प्रभू श्रीरामाचे विचार जनमाणसात रुजवावेत, हीच राष्ट्रनिर्माणाची पायरी आहे. आपल्या चेतनाचा विस्तार करावा लागेल. देवापासून देशाकडे आणि रामापासून राष्ट्राकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहीजे. हे करत असताना हनुमानाची निष्ठा, त्यांची सेवा, समर्पण हे गुण आपल्याला घ्यावे लागतील. प्रत्येक भारतीयामध्ये भक्ती, सेवा आणि समर्पणाचे भाव ही सक्षम भारताचा आधार बनतील.”

आज निराशेला स्थान नाही

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, आज देशात निराशेला अजिबात स्थान नाही. मी खूप लहान आहे, छोटा आहे, असा विचार जर कुणी करत असेल तर त्याने खारीच्या योगदानाची एकदा आठवण करावी. खारीने दिलेले योगदानच आपल्याला प्रेरणा देईल. व्यक्ती छोटा असो किंवा मोठा त्याच्या योगदानाचे महत्त्व वेगळे असते.

पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना; गोविंदगिरी महाराज म्हणाले, “श्रीमंत योगी…”

भारताचा पुढील काळ उज्ज्वल असणार आहे. भारताची वेळ आता सुरू झाली आहे. शतकांच्या संघर्षानंतर आम्ही इथे पोहोचलो आहोत. आता आम्ही थांबणार नाही. विकासाच्या शिखरावर जाऊनच आपण थांबायचे आहे. राम मंदिर निर्माण झाले आहे, याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

प्रभू रामाची मी आज माफी मागतो

माता जानकी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सगळ्यांनाही मी नमन करतो. मी दिव्य चेतना आपल्या शेजारी आहेत असं वाटतं आहे मी त्यांनाही नमन करतो आहे. आज मी प्रभू रामाची माफीही मागतो आहे. आमचा पुरुषार्थ, त्याग आणि तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. त्यामुळेच आपण इतकी युगं हे करु शकलो नाही. आज ती कमतरता आपण भरुन काढली आहे. मला विश्वास आहे की प्रभू राम आज आपल्याला माफ करतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राम वाद नाही, राम समाधान आहे

नरेंद्र मोदी म्हणाले, “एक काळ असा होता की लोक म्हणायचे की राम मंदिर तयार झालं तर आग लागेल. असे लोक भारताच्या सामाजिक भावनेच्या पवित्रतेला ओळखत नाहीत. श्रीरामाच्या मंदिराचे बांधकाम हे भारतीय समाजाच्या शांतता, संयम, परस्पर सौहार्द आणि समन्वयाचे प्रतीक आहे. या बांधकामामुळे आगीला नाही तर ऊर्जेला जन्म देत आहे. हे मंदिर केवळ देवाचे मंदिर नसून ते भारताच्या दृष्टीचे, भारताच्या तत्त्वज्ञानाचे, भारताचे मार्गदर्शक आणि रामाच्या रूपातील राष्ट्रीय चेतनेचे मंदिर आहे. राम आग नाही, राम ऊर्जा आहे. राम विवाद नाही, राम समाधान आहे. राम फक्त वर्तमान नाही, राम अनंत काळ आहे.”