अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर आता अंतिम निकालाची वेळ आली आहे. कारण, सुर्प्रीम कोर्टात होत असलेल्या नियमित सुनावणीचा बुधवारी अंतिम (४०वा) दिवस आहे. त्यानंतर पुढील चार आठवड्यात यावर अंतिम निकाल येणार आहे. मात्र, आपल्याला माहिती आहे का की, राम मंदिराचा मुद्दा पहिल्यांदा कधी उपस्थित झाला? तर, २०६ वर्षांपूर्वी ब्रिटिश राजवटीत हा मुद्दा उपस्थित झाला होता.
ब्रिटिश राजवटीत सन १८१३ मध्ये हिंदू संघटनांनी पहिल्यांदा बाबरी मशीदीच्या जागी राम मंदिर होते असा दावा केला होता. त्यांचे म्हणणे होते की, १५२६ मध्ये जेव्हा बाबर भारतात आला तेव्हा त्याने राम मंदिर तोडून त्याजागी मशीद बांधली होती. त्यानंतर त्याच्याच नावाने या मशीदीला बाबरी मशीद म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यावेळी देखील दोन्ही पक्षांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. राम मंदिराचा मुद्दा जोरदारपणे समोर आल्यानंतर ब्रिटिश सरकारने १८५९ मध्ये या वादग्रस्त जागेवर एक तारेचे कुंपण टाकले. त्यानंतर १८८५ मध्ये पहिल्यांदा महंत रघुबर दास यांनी ब्रिटिश सरकारच्या काळातच कोर्टात याचिका दाखल करीत मंदिर बनवण्याची परवानगी मागितली होती.
त्यानंतरही ही मागणी तीव्रतेने समोर येत गेली आणि १९३४ मध्ये या वादग्रस्त जागेवरुन हिंसाचार झाला. यावेळी पहिल्यांदा बाबरी मशिदीचा वादग्रस्त भाग तोडण्यात आला आला. त्यावेळी ब्रिटिश सरकारने याची डागडुजी केली. त्यानंतर २३ डिसेंबर १९४९ रोजी हिंदूंनी या जागेवर रामाची प्रतिमा ठेऊन या ठिकाणी पुजा-अर्चा सुरु केली. त्यानंतर मुस्लिमांनी या ठिकाणी नमाज पठण करणे बंद करुन कोर्टात धाव घेतली.
कोर्टात सुरु असलेल्या खटल्यादरम्यान, १९८६ मध्ये फैजाबाद जिल्हा न्यायाधीशांनी येथे पूजेला परवानगी दिली. त्यानंतर सील करण्यात आलेल्या या वादग्रस्त जागेवरील टाळे दुसऱ्यांदा खोलण्यात आले. मात्र, यामुळे नाराज झालेल्या मुस्लिम पक्षकारांनी बाबरी मशीद कार्यकारी समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी मोठ्या संख्येने अयोध्येत दाखल होत मशिदीवर पुन्हा एकदा हातोडा टाकला. दरम्यान, यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला, देशभरात धार्मिक दंगली उसळल्या. याचवेळी तात्पुरत्या स्वरुपात राम मंदिर देखील उभारण्यात आले. त्यानंतर मंदिर बनवण्यासाठी लागणाऱ्या दगड आणि विटांचा शोध सुरु झाला.