Ram Temple : अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ ला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ( Ram Temple ) करण्यात आली. या सोहळ्यासाठी देशभरातले सेलिब्रिटीज उपस्थित होते. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला २०२५ च्या जानेवारी महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहे. मात्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख या वर्षी २२ जानेवारी नाही तर ११ जानेवारी असणार आहे. यामागचं कारण काय? हे आपण जाणून घेणार आहोत.

२२ जानेवारी २०२४ ला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला

२२ जानेवारीला दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु झाला आणि सुमारे ४० मिनिटे चालला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे भाषण झालं. कार्यक्रमासाठी निवडक लोकांनाच प्रवेश मिळणार दिला गेला होता. त्यानंतर २३ जानेवारी २०२४ पासून मंदिराचं दर्शन खुलं करण्यात आलं. या वर्षी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा वर्धापन दिन साजरा करण्याबाबत राम मंदिर प्रतिष्ठानाची बैठक पार पडली.

बैठकीत काय निर्णय घेण्यात आले?

राम मंदिरात ( Ram Temple ) येणाऱ्या भक्तांचं उन आणि पाऊस यांपासून रक्षण व्हावं म्हणून तात्पुरत्या स्वरुपाचे जर्मन हँगर लावण्यात आले होते. तिथे आता कायमस्वरुपी शेड उभी केली जाईल.

सप्त मंडळ मंदिर हे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण केलं जाईल, तर शेषावतार मंदिर हे ऑगस्ट महिन्यांपर्यंत पूर्ण केलं जाईल. तर या मंदिरांबाहेरचं बाकी असलेलं काम हे ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण केलं जाईल.

अयोध्या मंदिर परिसराच्या दक्षिण भागात ५०० लोकांना बसण्यासाठी मोठं सभागृह उभारलं जाईल आणि मंदिर समितीचं कार्यालय उभं केलं जाईल. याचा शिलान्यास सोहळा पार पडला आहे.

मंदिर परिसरात भक्त सेवा केंद्र आणि आरोग्य केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा वर्धापन दिन ११ जानेवारीला साजरा होणार

संतांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे की हिंदू उत्सव आणि सण हे कायमच पंचागांनुसार साजरे केले जातात. रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ( Ram Temple ) हा गेल्या वर्षी २२ जानेवारीला पौष शुक्ल द्वादशी अर्थात कूर्म द्वादशीच्या दिवशी पार पडला. या वेळी म्हणजेच २०२५ मध्ये ही तिथी ११ जानेवारी येते आहे. त्यामुळे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पहिला वर्धापन दिन हा २२ जानेवारी नाही तर ११ जानेवारीला साजरा केला जाईल असं मंदिर प्रशासनाने सांगितलं आहे.