वादग्रस्त वक्तव्यांनी प्रकाशझोतात रहाणारे येथील भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या काळात अयोध्येत राम मंदिर बांधले जाईल अशी घोषणा केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केली आहे.
राम मंदिर भाजपच्या काळात बांधले नाही तर मग ते काँग्रेस किंवा सपा किंवा मायावती बांधतील काय असा सवाल त्यांनी केला आहे. जो पक्ष राम मंदिराच्या चळवळीला पाठिंबा देईल त्यांच्या कार्यक्रमाला पाठिंबा राहील असे साक्षी महाराजांनी सांगितले. आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आणखी चार वर्षे बाकी आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपने राम मंदिरासाठी चार राज्यांमधील सरकारे गमावली होती. त्यामुळे मंदिर उभारणीतील त्यांच्या हेतुबद्दल शंका घेऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते सुरेंद्र जैन यांनीही राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे. भाजप सरकारकडून विचारधारेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्दय़ांची सोडवणूक होणे अपेक्षित आहे. अन्यथा वाजपेयी सरकारच्या नेतृत्वाखाली जरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची अवस्था झाली तशी होण्याचा धोका असल्याचा इशारा जैन यांनी दिला. राम मंदिराची निर्मिती व्हावी अशी लोकांची अपेक्षा आहे. मोदी सरकार हा मुद्दा सोडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राम मंदिर हा भाजपसाठी राजकीय नव्हे तर जिव्हाळ्याचा विषय आहे असे प्रत्युत्तर भाजपचे चिटणीस श्रीकांत शर्मा यांनी दिले आहे. दोन मार्गानी याबाबत तोडगा काढता येऊ शकतो. एक तर सर्वोच्च न्यायालयात हा विषय प्रलंबित आहे. दुसऱ्या बाजूने चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोटय़वधी लोकांच्या श्रद्धेचा हा प्रश्न असून मंदिर उभारले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसची टीका
साक्षी महाराजांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी काँग्रेस नेते पी.सी.चाको यांनी केली आहे. सरकारचे विकासाचे धोरण आहे की संघाची विषयपत्रिका ते राबवू पाहात आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संघाची भाषा साक्षी महाराज बोलत असल्याची टीका राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jun 2015 रोजी प्रकाशित
भाजपच्या राजवटीत राम मंदिर उभारणी!
वादग्रस्त वक्तव्यांनी प्रकाशझोतात रहाणारे येथील भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या काळात अयोध्येत राम मंदिर बांधले जाईल अशी घोषणा केली आहे.

First published on: 08-06-2015 at 02:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram temple will be built during bjp rule sakshi maharaj