अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी या दिवशी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. आज गुरुवारी राम मंदिरात ही मूर्ती आणण्यात आली. जय श्रीराम या घोषणा देत क्रेनच्या मदतीने रामाची मूर्ती मंदिरात नेण्यात आली. मंदिरात मूर्ती ठेवण्यापूर्वी विधीवत पूजा करण्यात आली. आजच ही मूर्ती गाभाऱ्यात ठेवली जाण्याची शक्यता आहे. जी मूर्ती रामाच्या मंदिरात आणण्यात आली ती शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्ती आहे.

काय आहेत रामाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये?

गाभाऱ्यात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे ती सावळ्या रंगाची आहे आणि ही मूर्ती म्हणजे रामाचं बालरुप आहे.

५ वर्षांच्या रामाची ही मूर्ती आहे जी गाभाऱ्यात बसवली जाईल आणि त्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ तारखेला पार पडणार आहे.

शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली ही रामाची मूर्ती ५१ इंची आहे. या मूर्तीचं वजन २०० किलो आहे.

गाभाऱ्यात ही मूर्ती ठेवण्यात येणार आहे आणि २२ जानेवारी या दिवशी दुपारी १२.२० या वेळी प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु होईल जो दुपारी १ वाजपेर्यंत चालण्याची शक्यता आहे.

रामलल्लाची मूर्ती ५१ इंची का?

रामलल्लाची मूर्ती ५१ इंची उंचीची ठेवण्यात आली आहे. कारण भारतात सर्वसाधारणपणे पाच वर्षांच्या मुलाची उंची ही तितकीच असते. तसंच ५१ हा शुभ अंक मानला गेला आहे. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करुन स्थापन करण्यात येणारी मूर्ती ५१ इंची आहे. या मूर्तीची निर्मिती शाळीग्राम या दगडात कोरीव काम करुन करण्यात आली आहे. हिंदू देव-देवतांच्या मूर्ती या खासकरुन शाळीग्राम दगडापासूनच तयार केल्या जातात. आज तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

अरुण योगीराज यांनी घडवली मूर्ती

रामलल्लाची पाच वर्षांचं रुप दाखवणारी ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तीन मूर्तींचे पर्याय होते. सत्यनारायण पांडे यांनी संगमरवरापासून घडवलेली एक मूर्ती होती. तर गणेश भट्ट आणि अरुण योगीराज या शिल्पकारांनी शाळिग्राम दगडापासून तयार केलेल्या दोन मूर्ती होत्या. त्यातली अरुण योगीराज यांनी तयार केलेली मूर्ती निवडण्यात आली ाहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६ जानेवारी या दिवशी राम मंदिर विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय यांनी सांगितलं होतं की अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्तीच निवडण्यात आली आहे. अरुण योगीराज यांनी प्रभू रामाची पाच वर्षांचं रुप दाखवणारी मूर्ती घडवली आहे. ही मूर्ती गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करुन बसवण्यात येणार आहे.