नवी दिल्ली : इंग्रजांच्या काळातील कायदे रद्द करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून राज्यात मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इंग्रजांच्या कायद्याचे पालन करत आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची टीका हनुमान चालीसा प्रकरणात जामिनावर सुटलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
हनुमान चालीसाचे पठन केले म्हणून आम्हाला (राणा दाम्पत्य) १४ दिवस तुरुंगात टाकले गेले. आमच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला. या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्याबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, असे नवनीत राणा म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोहाच्या कायद्याला स्थगिती दिल्यामुळे राणा दाम्पत्याला दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आपण कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवायला तयार आहे. १४ मे रोजी सकाळी ९ वाजता दिल्लीत कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरात जाऊन महाआरती करू व उद्धव ठाकरे सरकारच्या रूपाने महाराष्ट्रावर आलेले संकट दूर करू, असे नवनीत राणा म्हणाल्या.
ब्रिटिश राजवटीच्या काळात महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस यांच्या विरोधात राजद्रोहाच्या कायद्याखाली गुन्हे नोंदवले गेले होते. आमच्याविरोधात हनुमान चालीसासाठी हाच गुन्हा दाखल केला गेला आहे, असे आमदार रवी राणा म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व मजबूत होते. बाळासाहेब असते तर धर्माचा प्रचार करणाऱ्यांविरोधात ब्रिटिशकालीन कायदे वापरले नसते, असे रवी राणा यांनी सांगितले.
‘मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना लाच’
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी आमच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. मुख्यमंत्र्यांनीही पांडे यांना लाच दिली. या संदर्भात २३ मे रोजी संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर होणाऱ्या सुनावणीत सविस्तर माहिती देऊ, असे राणा म्हणाले. खारमधील घरासंदर्भात मुंबई महापालिकेने (बीएमसी) दिलेल्या नोटिशीला कायद्याद्वारे प्रत्युत्तर दिले जाईल. शिवसेनेच्या ताब्यातील ‘’बीएमसी’’ भ्रष्टाचाराची खाण असल्याचा आरोपही राणा यांनी केला.