दुय्यम प्रतीच्या औषधांची निर्मिती आणि विक्री केल्याप्रकरणी रॅनबॅक्सीची सखोल चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. याचिकाकर्त्यांनी रॅनबॅक्सीविरोधात सबळ पुरावे सादर न केल्याचे कारण देत न्यायालयाने याचिका फेटाळली. दरम्यान, याचिका फेटाळण्यात आल्यामुळे रॅनबॅक्सीला दिलासा मिळाला असून, मुंबई शेअर बाजारात या कंपनीच्या शेअरच्या भावात वधारणा झालीये.
याचिकाकर्त्यांना रॅनबॅक्सी दुय्यम दर्जाची औषधे बनविते, असे सबळ पुरावे मिळाले, तर त्यांनी पुन्हा जनहित याचिका दाखल करावी, असा सल्लाही न्या. ए. के. पटनाईक आणि न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने दिला. अमेरिकेतील न्यायालयाने रॅनबॅक्सीविरोधात काय निर्णय दिला, त्याआधारे इथल्या याचिकेची सुनावणी घेता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.