Randhir Jaiswal On Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. अशातच काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा दणका दिला. भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आता अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारं एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर पोहोचलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या अतिरिक्त २५ टक्के आयातशुल्कामुळे भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी आज केलेल्या अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्काच्या घोषणेनंतर भारताने प्रतिक्रिया देत अमेरिकेला ठणकावलं आहे. अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याचं भारताने म्हटलं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत ही प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

रणधीर जयस्वाल यांनी काय म्हटलं?

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “इतर अनेक देशांनी स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी केलेल्या कृतींसाठी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही पुन्हा सांगतो की ही कृती अन्यायकारक आणि अवास्तव आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलेल”, असं रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.

भारतावरील आयातशुल्क आता ५० टक्क्यांवर

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा केल्यामुळे आता अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारे एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर पोहोचलं आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली असून अमेरिकेत भारतीय वस्तू महागणार आहेत. याचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय इशारा दिला होता?

डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इशारा दिला होता की, “भारत हा एक चांगला व्यापारी भागीदार नाही. भारत आमच्याबरोबर व्यापार करतो. मात्र, अमेरिका भारताबरोबर व्यापार करत नाही. भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता मला वाटतं की, पुढील २४ तासांत भारतावर आणखी जास्त टॅरिफ आकारावं लागेल. कारण भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, म्हणजेच युद्ध यंत्रणेला इंधन देत आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. दरम्यान, त्यानंतर २४ तासांत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा केली.