AAP MLA Accused Of Rape Flees To Australia : पंजाबमधील आम आदमी पक्षाचे खासदार हरमित सिंग पठानमाजरा हे २ सप्टेंबरपासून एका बलात्काराच्या प्रकरणात फरार आहेत. आता हे आमदार ऑस्ट्रेलियाला पळून गेल्याची बाब समोर आली आहे. एक व्हिडीओ मुलाखत समोर आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे.

सानौर येथील आमदार लपून बसल्याची शक्यता असण्याची शक्यता असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणावर पोलिसांकडून छापेमारी केली जात होती. आता हा आमदार ऑस्ट्रेलियात पळून गेल्याचे समजल्यानंतर पोलिसांसाठी ही शरमेची बाब ठरली आहे. पटियाला पोलिसांनी देखील या आम आदमी पक्षाच्या आमदाराविरोधात लुक आउट नोटीस जारी केली आहे.

पठानमाजरा हे शुक्रवारी ऑस्ट्रेलियामधील एका पंजाबी वेब चॅनेलला दिलेल्या व्हिडिओ मुलाखतीत दिसून आले, ज्यामध्ये त्यांनी दावा केला की ते ‘जामीन मिळाल्यावरच घरी परततील’.

विशेष म्हणजे त्यांनी स्वतःवरचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि हे प्रकरण पंजाबच्या लोकांचा आवाज बंद करण्यासाठी रचलेले एक राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

“पंजाबमध्ये मंत्री आणि आमदारांशी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जात नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध लादले जात आहेत. दिल्लीत पराभव झाल्यानंतर, त्या नेत्यांनी पंजाबचा ताबा घेतला आहे आणि ते त्याच पद्धतीने ते चालवत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. याबरोबरच त्यांनी न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचेही सांगितले.

“बलात्कार प्रकरणात हजर न राहिल्याने पटियाला कोर्टाने पठानमाजरा यांच्याविरुद्ध ‘घोषित अपराधी’ (Proclaimed Offender) म्हणून कारवाई आधीच सुरू केली आहे.

पंजाब पोलीस जेव्हा हरियाणाच्या कर्नाल येथे त्यांना अटक करण्यासाठी गेले तेव्हा हे आमदार पोलिसांच्या तावडीतून पळून गेले. तेव्हा पोलिसांनी दावा केला होता की, आमदार कर्नाल जिल्ह्यातील दाबरी गावात त्यांच्या एका नातेवाईकाच्या घरी असताना, त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथक गेले होते. तेव्हा आमदाराच्या समर्थकांनी गोळीबार आणि दगडफेक केली.

मात्र पठानमाजरा यांनी गोळीबारात सहभागाचा आरोप फेटाळून लावला आहे आणि त्यांचे फेक एन्काउंटर केले जाऊ शकते हे कळाल्यानंतर आपण पळून गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बलात्कार, फसवणूक, गुन्हेगारी धमकावणे अशा आरोपांखाली १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात आप आमदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

झिरकापूर येथील एका महिलेच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेचा आरोप आहे की, आमदारांनी स्वतःचा घटस्फोट झाला असल्याचे खोटे सांगितले, तिच्यासोबत संबंध ठेवले आणि नंतर २०२१ मध्ये आधीच विवाहित असतानाही तिच्याशी लग्न केले.

तसेच महिलेने आरोप केला आमदाराने लैगिंक अत्याचार, धमक्या आणि तिला ‘अश्लील’ साहित्य पाठवणे सुरूच ठेवले.