बलात्कार प्रकरणातील आरोपीने उत्तर प्रदेशमधील मौदाहा कोतवाली पोलीस स्थानकाच्या तुरुंगामध्येच आत्महत्या केल्याची घटना समोर आळी आहे. या प्रकरणानंतर पोलीस स्थानकातील तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.
एक पोलीस उपनिरिक्षक आणि दोन हवालदारांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना दिली आहे. प्राथमिक तपासामध्ये या तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वागणुकीमुळेच ही आत्महत्येची घटना घडल्याचं स्पष्ट झाल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. हमीरपूरचे पोलीस अधिक्षक नरेंद्र कुमार सिंघ यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.
मोहबा जिल्ह्यामधील खांडुआ गावामधील रहिवाशी असणाऱ्या संजय नावाच्या आरोपीने गळफास लावून मंगळवारी रात्री मौदाहा कोतवाली पोलीस स्थानकाच्या तुरुंगातच आथ्महत्या केली. हे प्रकरण समोर आल्यानंतर संजयला तातडीने जवळच्या जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. मात्र संजयचा रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी पोलिसांनी संजयला अटक केली होती.
पोलीस उपनिरीक्षक आणि दोन हवालदारांना या प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांना तातडीने निलंबित करण्यात आलं असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. या प्रकरणाचा तपास आता हमीरपूरच्या अतिरिक्त उपनिरीक्षकांकडे सोपवण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकक्षकांनी दिलीय. संजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.