वृत्तसंस्था, हैदराबाद : ‘‘तेलंगणा राज्य सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात वेगाने प्रगती करत असून, आरोग्य सेवा-सुविधा राज्यातील गरजूंच्या दारापर्यंत पोहोचवत आहे,’’ अशी ग्वाही तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी दिली. येथील प्रगती भवनातून नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी तेलंगणा सरकार गेल्या दहा वर्षांपासून सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला आपल्या धोरणात कसा अग्रक्रम देत आहे, याची सविस्तर माहिती दिली. सर्वाना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी विविध कल्पना आणि मोहिमा कशा राबवल्या जात आहे, हेही त्यांनी सांगितले. राव म्हणाले, की तेलंगणा राज्याने उपलब्ध साधन-स्त्रोतांसह दरवर्षी दहा हजार जण वैद्यकीय पदवीधर करण्याचा विक्रम केला आहे. ही दुर्मीळ आणि क्रांतिकारी कामगिरी आहे. त्यामुळे तेलंगणाला या क्षेत्रातील देशातील एक आदर्श राज्य म्हणून ओळख प्राप्त झाली आहे.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रामीण आरोग्य सेवांच्या यंत्रणांत लक्षणीय सुधारणा झाल्याचे सांगून राव म्हणाले, की आणि अम्मा ओडी, केसीआर किट आणि इतर अभिनव योजनांमुळे राज्याने आरोग्यसेवा प्रगती करून, ती प्रभावी केली आहे.  राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवा यंत्रणेने कात टाकून काम करावे, अशी सरकारच्या इच्छा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील वैद्यकीय आणि आरोग्य सेवा विभागाने प्रभावी कार्यक्रम, मोहिमा आणि योजना राबवून आपले एकमेवाद्वितीय वेगळेपण अधोरेखित केले आहे. जेव्हा तेलंगणा राज्यनिर्मिती झाली, तेव्हा अतिदुर्गम प्रदेशांत आरोग्य सेवा यंत्रणा पुरेशी नव्हती. परंतु आरोग्य मंत्रालयाने आखलेली धोरणे, संकल्पनांमुळे ग्रामीण अर्धशहरी आणि शहरी लोकांना या सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या.