टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणाऱ्या ‘सेवा भारती’ संस्थेकडून ‘सेवा रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. समाजसाठी केलेल्या वेगवेगळ्या कामांसाठी टाटा यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. रतन टाटा प्रत्यक्षात या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

रतन टाटांबरोबरच चलासनी बाबू राजेंद्र प्रसाद यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या दोन्ही नामवंत व्यक्तींना ‘सामजिक विकासासाठी या व्यक्तींनी वेळोवेळी दिलेला निधी आणि योगदान’ यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे असं संस्थेने जारी केलेल्या पत्रकात म्हटल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

“एकूण २४ व्यक्ती आणि संस्थांना समाज कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग (निवृत्त) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला,” असंही संस्थेनं म्हटलं आहे. उत्तराखंडच्या राज्यपालांनी सेवा म्हणजे काय याचा अर्थ ‘सेवा भारती’कडून शिकता येईल असं म्हणत या संस्थेचं कौतुक केलं. ज्यांना कोणीही त्यांच्यासाठी ‘सेवा भारती’ आहे, असंही ते म्हणाले.

रतन टाटा यांचा काही दिवसांपूर्वीच पीएम केअर फंडाच्या विश्वस्तांमध्ये समावेश करण्यात आला आहे. रतन टाटा यांच्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती के टी थॉमस, माजी उपसभापती करिया मुंडा यांच्यासह नामांकित व्यक्तींचीही विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रतन टाटा यांचा जन्म १९३७ साली मुंबईत झाला. रतन टाटा हे सध्याच्या घडीला देशातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक आहेत. एक यशस्वी उद्योजक आणि संवदेनशील मनाचे व्यक्तीमत्व म्हणून टाटांकडे पाहिलं जातं. त्यांना २००८ साली ‘पद्म विभूषण’ आणि २००० साली ‘पद्म भूषण’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.