नवी दिल्ली : ‘शिधापत्रिकाधारकांना तिरंगा खरेदी करण्यासाठी बळजबरी केली जात आहे. अशा तऱ्हेने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे गरिबांवर ओझे होत असेल, तर ते दुर्दैवी लक्षण असल्याची टीका भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी बुधवारी केली. या तिरंगा ध्वजाला प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्थान आहे. गरिबांचे अन्न ओरबाडून, त्यांच्याकडून या ध्वजाची किंमत वसूल करणे लाजिरवाणे आहे,’ अशी टीकाही वरुण यांनी ‘ट्विट’द्वारे केली.

पिलिभीतचे खासदार असलेल्या वरुण यांनी प्रसृत केलेल्या चित्रफितीत काही शिधापत्रिकाधारक आपल्याला तिरंगा ध्वज घेण्यासाठी २० रुपये देण्याची बळजबरी केली जात असल्याची तक्रार करताना दिसत आहेत. तिरंगा घेतला नाही, तर त्यांचे हक्काचे धान्य त्यांना नाकारले जाणे फारच दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली.

केंद्र सरकारतर्फे १३ ते १५ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केली आहे. प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकावण्याचे आवाहन केंद्र सरकारने नागरिकांना केले आहे. पंतप्रधान मोदींच्या या कल्पनेला यशस्वी करण्यासाठी भाजपतर्फे व्यापक स्तरावर ही मोहीम राबवण्यात येत आहे. वरुण गांधींनी आतापर्यंत अनेक विषयांवर स्वत:च्याच भाजप सरकारला याआधीही टीकेचे लक्ष्य केले आहे.