scorecardresearch

गतचुकांना क्षमा करा आणि संधी द्या! भाजप

‘भूतकाळात आमच्या हातून ज्या काही चुका झाल्या असतील, उणिवा राहिल्या असतील, त्याबद्दल क्षमा करा आणि आम्हाला एक संधी द्या,’ अशी आर्त साद घालत भाजपने मंगळवारी देशातील मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याच प्रयत्न केला.

उनको देखा बार बार.. कमसे कम हमको देखो एक बार.. – राजनाथ सिंह
‘भूतकाळात आमच्या हातून ज्या काही चुका झाल्या असतील, उणिवा राहिल्या असतील, त्याबद्दल क्षमा करा आणि आम्हाला एक संधी द्या,’ अशी आर्त साद घालत भाजपने मंगळवारी देशातील मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याच प्रयत्न केला. काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या अपप्रचाराकडे लक्ष देऊ नका, असे सांगतानाच मुस्लिमांना समानतेने वागवले जाईल, असे आवाहनही भाजपने केले.
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस किंवा अन्य पक्षांच्या पारडय़ात पडणाऱ्या मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांचा पक्षाला फटका बसेल, हे हेरून भाजपने आता या समुदायाकडे आपले लक्ष वळवले आहे. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘मोदी फॉर पीएम- मिशन २७२+ – रोल ऑफ मुस्लिम्स’ या मेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मुस्लिम समुदायाला भावनिक साद घातली. ‘याआधी जेव्हा कधी, कुठे आमच्या हातून काही चुका झाल्या असतील, तर आम्ही हात जोडून तुमची माफी मागतो,’ असे ते म्हणाले. भाजप हा मुस्लिमविरोधी पक्ष नाही, असे सांगताना ते म्हणाले,‘आम्हाला एक संधी द्या. जर आम्ही
तुमच्या अपेक्षांवर खरे उतरलो नाही तर पुन्हा ढुंकूनही आमच्याकडे बघू
नका.’
केवळ एक सरकार निवडण्यासाठी मतदान न करता माणुसकी आणि बंधुभाव असलेल्या राष्ट्राच्या उभारणीसाठी मत द्या, असे आवाहनही त्यांनी या कार्यक्रमात केले.
‘गुजरातमधील २००२च्या दंगलींदरम्यान, मोदी यांनी मुस्लिमांचे हत्याकांड घडवण्याचे आदेश दिले होते’ असा अपप्रचार काँग्रेस करत असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. ‘या दंगलींप्रकरणी न्यायालयानेही मोदींना निदरेष ठरवले आहे. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात काय उरले आहे का?’ असा सवाल राजनाथ यांनी केला. तर ‘जातीय दंगलींपासून मुक्त भारत बनवण्यासाठी आणि सुरक्षित, समान आणि आर्थिक विकास असलेले राज्य आणण्यासाठी भाजपला मदत करा,’ असे आवाहन भाजप नेते अरुण जेटली यांनी केले.
भाजपच्या कृतीत पश्चाताप नाही -काँग्रेस
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिमांची माफी मागण्याच्या भाजपच्या प्रयत्नांवर टीका करताना काँग्रेसने ‘भाजपच्या कृतीत पश्चाताप दिसत नाही’ असे म्हटले आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आजवर गुजरातमध्ये एकाही मुस्लिमाला निवडणुकीचे तिकीट दिले नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल यांनी केली. मोदी यांनी नेहमीच मुस्लिमांमध्ये भयगंड निर्माण केला आहे, असा आरोपही त्यांनी केला. भाजपने नेहमीच राममंदिराचे राजकारण केले, असे सांगताना ते म्हणाले,‘अयोध्येत राममंदिर उभारण्याची ग्वाही देत ते सत्तेत आले. मात्र, मंदिर उभारलेच नाही.’

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ready to apologise to you for mistakes in past rajnath tells muslims

ताज्या बातम्या