मंगळुरू : कर्नाटकच्या किनारपट्टी भागांत सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन पुरते विस्कळीत झाले. दक्षिण कन्नड जिल्ह्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) पथके तैनात करण्यात आली आहेत.

कर्नाटकच्या किनारी भागाला पुढील चार ते पाच दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे मंगळूरु शहराच्या अनेक भागांत पाणी साचले. सांडपाण्याचा निचरा करणारी यंत्रणा अपयशी ठरल्याने पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. तसेच जिल्ह्याच्या डोंगराळ भागात भूस्खलनाच्या किरकोळ घटना घडल्या. मंगळुरू शहरातील अनेक ठिकाणी पाणी भरले.

२४ तासांत १५० मिमीपेक्षा अधिक पाऊस

मंगळुरू जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८पर्यंतच्या २४ तासांत अनेक भागांत १५० मि.मी पेक्षा अधिक पाऊस पडला. बेलारे येथे सर्वाधिक २००.५ मिमी पावसाची नोंद झाली, त्यापाठोपाठ बंटवालच्या सारापाडी आणि पुत्तूरच्या बेलांदूर येथे प्रत्येकी १९० मिमी पाऊस नोंदवला गेला. अनेक शाळा आणि आंगणवाड्या बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

उत्तर केरळमध्ये पावसाचा हाहाकार

उत्तर केरळलाही संततधार पावसाने जबर तडाखा दिला. या भागातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर सुरूच असून लोकांना अनेक ठिकाणी मदत छावण्यांमध्ये तसेच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. वायनाडच्या सुलतान बाथेरी येथील पुझमकुनी गावातील अनेक आदिवासी कुटुंबांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘दिल्लीत पाणी साचल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई’

दिल्लीत रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याच्या तक्रारी आल्याने सोमवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. पाणी साचण्याचे प्रकार घडल्यास संबंधित अधिकार्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी तंबी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली.