आयपीएल माजी प्रमुख ललित मोदी यांच्या अडचणीत वाढ झाली असून अंमलबजावणी संचलनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाच्या(सीबीआय) मागणीची दखल घेत सिंगापूर सरकारने ललित मोदी यांची दोन बँक खाती गोठविण्यात आली आहेत. तसेच तेथील सरकारने ललित मोदींविरोधात आणखी माहितीची मागणी भारताकडे केली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ललित मोदी प्रकरणावरून सिंगापूर सरकारच्या अधिकाऱयांमध्ये गेले काही दिवस चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर मोदींची दोन बँक खाती गोठवण्यात आली. दरम्यान, सीबीआयने इंटरपोलला पत्रव्यवहारकरून ललित मोदी यांच्याविरोधात रेट कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी केली आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता असून ही नोटीस जारी करण्यात आल्यास ललित मोदींना अटक होऊ शकते. याआधी केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही ललित मोदी यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असून त्यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली जाऊ शकते, असे विधान केले होते. यूपीएच्या कार्यकाळात मोदी यांच्याविरुद्ध फक्त ‘फेमा’ चे प्रकरण दाखल करण्यात आले, ज्यात अटकेची तरतूद नसून जास्तीत जास्त शिक्षा फक्त दंडाची आहे. त्यांच्याविरुद्ध जी ‘लाइट ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ जारी करण्यात आली, ती केवळ क्षेत्रीय विमानतळांसाठी लागू आहे. असे असताना लंडनमध्ये बसलेल्या कुणा व्यक्तीला परत कसे आणता येईल, असा प्रश्न देखील राठोड यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे रेड कॉर्नर नोटीस बजावून ललित मोदींना भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचे समजते.