अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचं आणि आनंदाचा वातावरण आहे. अशा कार्यक्रमात कोणत्याही पद्धतीचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याकरताही मोठे प्रयत्न केले जात आहेत. तसंच, गेल्या कित्येक दशकांपासून प्रतिक्षित असलेल्या या राम मंदिरात अखेर रामलल्ला विराजमान होणार असल्याने भारतातील सर्वधर्मीय नागरिकांच्या मनात आनंदाचं वातावरण असल्याचं स्पष्ट झालं आहे. “अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याबद्दल मुस्लिम समाजाच्या मनात कोणतीही नकारत्मक भावना नाही”, असं इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे सचिव अथर हुसेन शनिवारी म्हणाले. टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

“मंदिराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लिम समाजाने स्वीकारला आहे. अभिषेक सोहळा आणि मंदिराबाबत मुस्लिम समुदायात कोणतीही नकारात्मक भावना नाही, असं ते म्हणाले. अयोध्येपासून सुरुवात करून देशातील एकता जगासमोर दाखवली जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा >> Ayodhya Ram Mandir : हजारो मृतदेहांचं शवविच्छेदन करणाऱ्या महिलेला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण, जाणून घ्या कोण आहेत संतोषी दुर्गा?

भारतीयांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये

अथर हुसेन म्हणाले, आम्ही आमची एकता आणि जातीय सलोखा जगाला सांगू आणि त्याची सुरुवात अयोध्येपासूनच करू. आमची राज्यघटना हा आपल्या लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, असा आमचा विश्वास आहे. अयोध्या प्रकरणाच्या निकालापूर्वीही आम्ही सांगितले होते की न्यायालयाकडून जो निर्णय येईल, तो स्वीकारला जाईल. अभिषेक समारंभाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेवर कोणत्याही भारतीयने प्रश्न उपस्थित करू नये.

हेही वाचा >> अयोध्येतील सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भारतीयांना आवाहन; म्हणाले, “२२ जानेवारीला सगळ्यांनी…!”

मोदींचं देशभरातील नागरिकांना आवाहन

दरम्यान, राम मंदिर सोहळ्यासाठी भारतातील अनेक प्रतिष्ठित लोकांना आमंत्रणे देण्यात आली आहेत. तसंच, देशाच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या, देशाला अभिमान वाटणाऱ्या सामान्य कुटुंबातील लोकांनाही आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येसह देशभर दिवाळी साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिमेचेही आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी अयोध्येत गर्दी न करता आपल्या घरातूनच भगवान रामासठी दीप प्रज्वलित करा, असं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.