अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. मात्र हा निर्णय कोर्टाने का घेतला ते रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे. सतीश माने शिंदे हे रिया चक्रवर्तीचे वकील आहेत. त्यांनी हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे का सोपवलं त्याचं कारण स्पष्ट केलं आहे.

काय म्हणालेत रियाचे वकिल?
“आदरणीय सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. समोर काय काय तथ्य आली आहेत ते पाहिलं. तसंच तपास किती बारकाईने केला गेला आहे तेदेखील पाहिलं. मुंबई पोलिसांनी सादर केलेला अहवालही काळजीपूर्वक तपासला. महाराष्ट्रात सुशांत सिंह प्रकरणावरुन काय आरोप झाले तेदेखील तपासण्यात आलं. रिया चक्रवर्तीलाही वाटत होतंच की हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावं. या प्रकरणावरुन बिहार आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्येही जे आरोप झाले तेदेखील कोर्टाने तपासले. त्यामुळे हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला. कलम १४२ प्रमाणे सीबीआयला अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालण्याचा पूर्ण अधिकार आहे. दरम्यान रियाने यासंदर्भातली मागणी केली होती. सीबीआयने केलेल्या चौकशीला ती सामोरीही गेली आहे. मुंबई पोलीस आणि ईडीच्या चौकशीलाही ती सामोरी गेली आहे. तिने या प्रकरणातलं सत्य कधीही लपवलेलं नाही असंही सतीश मानेशिंदे यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी त्याच्या वांद्रे येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरलं. मात्र या घटनेनंतर काही दिवसांनीच सुशांत सिंह राजपूत हा घराणेशाही आणि हिंदी सिनेसृष्टीतील गटबाजीचा बळी आहे असे आरोप होऊ लागले. ज्यानंतर पोलिसांनीही हा अँगल तपासण्याचं ठरवलं. या प्रकरणात आत्तापर्यंत ४० पेक्षा जास्त लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आता सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलंय.