PM Narendra Modi Birthday : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आज वयाची ७५ वर्षे पूर्ण केले असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील सर्वच राजकीय नेते मंडळी आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्ती त्यांना शुभेच्छा देत आहेत. अनेक नेत्यांनी एक्स (ट्विटर) अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. दरम्यान, रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी देखील पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आणखी २५ वर्षे पंतप्रधान मोदींनी भारताची सेवा करावी’, असं मुकेश अंबानी यांनी शुभेच्छा देताना म्हटलं आहे.

मुकेश अंबानी काय म्हणाले?

शुभेच्छा देतानाचा एक व्हिडीओ मुकेश अंबानी यांनी शेअर करत म्हटलं की, “आज १.४५ अब्ज भारतीयांसाठी उत्सवाचा दिवस आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. भारतातील संपूर्ण व्यापारी समुदायाच्यावतीने रिलायन्स कुटुंब आणि अंबानी कुटुंबाच्यावतीने पंतप्रधान मोदींना मी शुभेच्छा देतो. भारताच्या अमृत काळात मोदींचा अमृत महोत्सव येत आहे हा योगायोग नाही. स्वतंत्र भारत १०० वर्षांचा झाल्यानंतर देखील मोदींनी भारताची सेवा करत राहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे”, असं मुकेश अंबानींनी म्हटलं. तसेच जीवेत् शरदः शतम्, परम आदरणीय नरेंद्रभाई असंही मुकेश अंबानी म्हणाले.

दरम्यान, मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भारताला जागतिक महासत्ता बनवण्याच्या त्यांच्या नेतृत्वाचं आणि दूरदृष्टीचं कौतुक केलं. ते म्हणाले की, “ईश्वराने मोदींना अवतार पुरुष म्हणून आपल्या मातृभूमीचं नेतृत्व करण्यासाठी पाठवलं आहे. जेणेकरून भारत जगातील सर्वोत्तम राष्ट्र बनू शकेल. आजपर्यंत मी असा कोणताही नेता पाहिलेला नाही, जो भारताच्या आणि भारतीयांच्या भविष्यासाठी अथक मेहनत घेत आहेत.”

अमित शाहांनी सांगितली मोदींबरोबरच्या प्रवासाची आठवण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबरोबर केलेल्या प्रवासाची आठवण सांगितली. “एकदा मी मोदींबरोबर अहमदाबाद येथून राजकोटला जाण्यासाठी निघालो होतो. या प्रवासादरम्यान रात्रीचे साडेआठ वाजले होते. मोदीजी त्यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घरी जेवण करायचे. मात्र, त्यादिवशी त्यांनी सूर्यनगर परिसरात असलेल्या एका भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या ढाब्यावर कार थांबवली आणि ते जेवायला बसले. त्यावेळी मला आणि आमच्याबरोबर असलेल्या इतर कार्यकर्त्यांना कडाडून भूक लागली होती. त्यामुळे आम्ही पोटभर जेवण केले. मोदींनी मात्र काही फळं आणि चिप्सच खाल्ले. रात्री मी विचार केला की- मोदीजींनी ढाब्यावर जेवण केले नाही. मग त्यांनी कार नेमकी कशासाठी थांबवली होती. नंतर माझ्या लक्षात आले की- त्यांनी कार स्वत:साठी नाही तर इतर कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी थांबवली होती. अशा प्रकारे ते काहीही न बोलता कार्यकर्त्यांची काळजी घेतात,” असे सांगताना अमित शाह भावुक झाले होते.