scorecardresearch

आत्तापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या बेटांवरचे ‘हे’ देशही करोनाच्या तावडीत; बाधित विदेशी पर्यटकांमुळे लावावा लागला लॉकडाउन

आंतरराष्ट्रीय प्रवासावरची बंदी उठवल्यानंतरचं हे पहिलंच उड्डाण होतं. यातून आलेले प्रवासी करोनाबाधित आढळून आल्याने ‘या’ देशामध्ये आता करोनाचा शिरकाव झाल्याचं समोर आलं आहे.

आत्तापर्यंत किरीबातीमध्ये एकाही करोना रुग्णाची नोंद झाली नव्हती. तर समोआमध्ये आत्तापर्यंत करोनाचे केवळ दोन रुग्ण आढळले होते. (प्रातिनिधिक छायाचित्र)

पॅसिफिक बेटांवर असलेले देश आत्तापर्यंत करोनाच्या प्रादुर्भावापासून लांब होते. मात्र परदेशांमधून येणाऱ्या पर्यटकांमुळे आता या देशांमध्येही करोनाचा प्रसार झाला आहे. दोन वर्षांपासून करोनाच्या तावडीतून सुटलेल्या या बेटांना आता मात्र करोनाचा फटका बसला आहे. किरीबाती आणि समोआ या देशांमध्ये आता लॉकडाउन लावण्यात आला आहे.

आत्तापर्यंत किरीबातीमध्ये एकाही करोना रुग्णाची नोंद झाली नव्हती. तर समोआमध्ये आत्तापर्यंत करोनाचे केवळ दोन रुग्ण आढळले होते. मात्र विदेशातून आलेल्या लोकांमुळे इथंही करोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाने संपूर्ण लॉकडाउन लावला आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, फिजीवरून काही नागरिक विमानाने किरीबातीला आले होते. आंतरराष्ट्रीय प्रवासावरची बंदी उठवल्यानंतरचं हे पहिलंच उड्डाण होतं. हे ३६ प्रवासी करोनाबाधित आढळून आल्याने या देशामध्ये आता करोनाचा शिरकाव झाल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – COVID : देशभरात २४ तासात ३ लाख ३७ हजार ७०४ जण करोनाबाधित ; ४८८ रूग्णांचा मृत्यू

तर समोआ देशात ब्रिस्बेनहून परत येणाऱ्या विमानातून आलेल्या प्रवाशांमार्फत करोनाचा प्रसार झाल्याने जेव्हा देशात १५ रुग्ण आढळून आल्यानंतर कडक निर्बंध लावण्यात आल्याची माहिती पंतप्रधान फियाम नाओमी माताफा यांनी दिली. सोमवारी रात्री हे सर्व निर्बंध दूर करण्यात येतील अशी माहितीही त्यांनी दिली आहे. तर बाधित आढळलेले सर्वच्या सर्व रुग्ण हे ओमायक्रॉनचे असून ते सध्या विलगीकरणात असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.

किरीबातीमध्ये अनिश्चित काळासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. इथल्या ३४ टक्के जनतेने करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर समोआ देशात पूर्णतः लसीकृत झालेल्या नागरिकांचं प्रमाण ६२ टक्के आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Remote pacific islands with only 2 covid cases until now in lockdown vsk

ताज्या बातम्या