जाट समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्दय़ावरून काँग्रेस दुटप्पी राजकारण करीत असल्याचा आरोप करून शुक्रवारी या समाजाने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ठाम विरोध करण्याचा निर्णय जाहीर केला.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्लीत जाट समाजाचे काही विधानसभा मतदारसंघात प्राबल्य आहे. त्या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव करण्यासाठी जाट समाजाचे प्रतिनिधी अन्य योग्य उमेदवाराला पाठिंबा देतील, असे अखिल भारतीय जाट आरक्षण आंदोलन समितीचे अध्यक्ष यशपाल मलिक यांनी सांगितले.
राजस्थानातील ढोलपूर आणि भारतपूर हे दोन जिल्हे अद्यापही केंद्रीय यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाहीत, ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे. आम्ही  आंदोलने पुकारली तरीही मागण्या मान्य झाल्या नाहीत. असे मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जो उमेदवार काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करू शकतो त्याला निवडणुकीत मदत करण्याबाबतचा आदेश ‘जाट संदेश’द्वारे सर्व समाजाला धाडण्यात आला आहे. आम्हाला आरक्षणाबाबतची अधिसूचना हवी आहे, आश्वासन नको, असेही मलिक यांनी म्हटले आहे.