लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. आता सातव्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांनी एकमेकांवर फैरी झाडल्याचं पाहायला मिळालं. या सर्व घडामोडीसंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भाष्य केलं आहे. तसंच ते स्वत: राजकारणात येणार का?, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल काय वाटतं?, अशा अनेक मुद्यांवर त्यांनी आपलं मत मांडलं आहे.

माजी गव्हर्नर रघुराम राजन हे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या जवळपास एका वर्षापासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तसेच राहुल गांधी यांनी जेव्हा भारत जोडो यात्रा काढली होती, तेव्हा रघुराम राजन हे स्वत: त्या यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर रघुराम राजन हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. दरम्यान, या सर्व गोष्टीवर आता द प्रिंटसाठी दिलेल्या मुलाखतीत बोलताना रघुराम राजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा : “गांधींना कोणी ओळखत नव्हतं, चित्रपट बनला तेव्हा त्यांना जगभरात ओळख मिळाली”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान चर्चेत!

रघुराम राजन काय म्हणाले?

“मी राजकारणात यावं, असं माझ्या कुटुंबीयांना वाटत नाही. मात्र, राजकारणात येण्यापेक्षा मला शक्य होईल तेवढं मार्गदर्शन करायला आवडेल. मी याआधीही वारंवार सांगितलं. पण लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. मी राजकारणात येऊ इच्छित नाही. मी सरकारमध्ये आहे किंवा नाही, याची पर्वा मी करत नाही. मात्र, सरकारच्या आर्थिक धोरणांमध्ये मी बोलतो आणि हाच माझा प्रयत्न राहणार आहे”, असं रघुराम राजन यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी यांच्याबाबत काय म्हणाले?

माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना यावेळी राहुल गांधी यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, “राहुल गांधी यांना अनेकदा नेतृत्व करण्याची क्षमता नसलेले व्यक्ती म्हणून संबोधित करण्यात आले. मात्र, मला वाटते की ते प्रचंड हुशार आणि धाडसी आहेत. पण राहुल गांधी यांच्याबाबत जे चित्र निर्माण करण्यात आलं ते चुकीचं आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या आजींची आणि वडीलांची हत्या होताना पाहिली. राहुल गांधी यांच्याकडे दृढ विश्वास आणि ते मांडत असलेले मुद्दे चांगले आहेत”, असं रघुराम राजन यांनी म्हटलं. दरम्यान,भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम यांनी अनेकदा भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केलेलं आहे. तसेच केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाबाबतही त्यांनी अनेकवेळा आपलं मत मांडलेलं आहे.