काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांमध्ये पैशांचा मोठ्याप्रमाणावर तुटवडा निर्माण झाल्यामुळे स्थानिक तरूणांचे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. दहशतवाद्यांकडून पैसे लुटण्याचे वाढलेले प्रकार आणि दक्षिण काश्मीरमधील अशांततेच्या पार्श्वभूमीवर जम्मू अॅण्ड काश्मीर बँकेने आपल्या शाखांमधील रोखीचे व्यवहार थांबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बँकेच्या ४० शाखांमधील व्यवहार ठप्प झाले होते. साहजिकच याठिकाणी पैशांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक स्थानिक तरूण दहशतवादी संघटनांमध्ये भरती होताना दिसत आहेत.
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या माहितीनुसार, नोटाबंदीच्या निर्णयानंतर काश्मीर खोऱ्यात आतापर्यंत बँक लुटण्याच्या १३ आणि घरफोडीच्या ९ घटना घडल्या आहेत. यापैकी बहुतांश वेळा याठिकाणी सर्वाधिक शाखा असलेल्या जम्मू अॅण्ड काश्मीर बँकेला लक्ष्य करण्यात आले आहे. याशिवाय, एसबीआय, अॅक्सिस बँक आणि इलाकी देहात या बँकांवर नोटाबंदीनंतर टाकण्यात आलेल्या दरोड्यात ९०.८७ लाखांची रक्कम लुटून नेण्यात आली आहे. दहशतवादी संघटनांमध्ये अनेक स्थानिकांचा भरणा असल्याने पैसे आणि शस्त्र लुटण्याचेही प्रकार वाढले आहेत.
नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी पैसे लुटण्याच्या घटनांमध्ये सामील असणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या कमी होती. मात्र, आता पाकिस्तानकडून अनेक स्थानिकांना बँका लुटण्यासाठी आणि शस्त्रे पळवून नेण्यासाठी चिथावणी दिली जात आहे. या माध्यमातून पाकिस्तान सुप्तपणे आपला अजेंडा रेटत आहे. याशिवाय, पाकिस्तानकडून सोशल मीडियावरूनही बँक लुटीच्या घटनांचे समर्थन केले जात आहे. बँक लुटीला ‘माल-ए-गनीमत’ असे संबोधून पाकिस्तानकडून या कृत्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला दहशतवादी संघटनांमध्ये ८० टक्के स्थानिकांचा समावेश असल्याची माहिती आहे.
मात्र, या आर्थिक चणचणीमुळे दुसरीकडे दहशतवादी संघटनांचीही कोंडी झाली आहे. पाकिस्तानकडून या संघटनांना अर्थसहाय्य दिले जात असले तरी ही रक्कम थोडी थोडी करून येते. यापैकी मोठा वाटा हा दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी आणि शस्त्रास्त्रांसाठी वापरला जातो. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य आणि पोलिसांकडून ही आर्थिक रसद तोडण्याचे प्रयत्न वेळोवेळी झाले आहेत. याशिवाय, काही दिवसांपूर्वीच दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना अर्थसहाय्य करणाऱ्या नासिर शफी मीर या व्यक्तीची बँक खाती सरकारकडून गोठवण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक दहशतवाद्यांना आर्थिक चणचण भासू लागली आहे.