बिहारचे राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जहरी टीका केलीय. त्यांनी आरएसएसवर शेतकऱ्यांना खलिस्तानी आणि पाकिस्तानी म्हटल्याचा आरोप केला. आरएसएस इंग्रजांचे गुलाम आणि गांधीजींचे हत्यारे असल्याचंही ते म्हणाले. संयुक्त किसान मोर्चाने बोलावलेल्या भारत बंदच्या वेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आरएसएसचे लोक अल्पसंख्यांकावर हल्ले करत असल्याचाही आरोप केला.

बिहार राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह म्हणाले, “भारत गावांचा देश आहे असं बापू मानायचे. जोपर्यंत गाव पुढे जाणार नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. आज भारत जगातील सर्वात भुकेललेला देश आणि बिहार सर्वात भुकेललेलं राज्य का आहे. ज्यांनी गांधीजींची हत्या केली आणि जे लोक इंग्रजांचे दलाल होते तेच लोक आम्हाला शेतकरी मानत नाहीत. ते शेतकऱ्यांना खालिस्तानी आणि पाकिस्तानी म्हणतात.”

“संघाचे लोक अल्पसंख्यांकांवर हल्ले करतात”

“अफगाणिस्तानमध्ये तालिबान ही एक संस्कृती आहे. त्याचप्रमाणे भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) हेच तालिबान आहे. या संघटनेचे लोक कायम दाढीवाल्यांना, बांगड्या विकणाऱ्यांना आणि अल्पसंख्यांकांना मारतात. लालू प्रसाद यादव एकतेविषयी बोलतात म्हणून ते तुरुंगात गेलेत. त्यांनी नेहमी धार्मिक उन्माद करणाऱ्यांना रोखण्याचं काम केलं,” असं मत जगदानंद सिंह यांनी व्यक्ते केलंय.

जगदानंद सिंहांकडून आरएसएसची तालिबानशी तुलना

“धार्मिक उन्माद करणाऱ्या तालिबानची चर्चा या देशात का होत आहे. जर तालिबान धार्मिक उन्मादी संघटना आहे तर आरएसएस देखील धार्मिक उन्माद करणारी संघटना आहे. तालिबानी लोक कुणालाच सहन करत नाहीत. आरएसएसचंही असंच आहे. हे लोक बांगड्या विकणाऱ्यांना का अडवतात? कोरोना काळात मशिदीत पकडण्यात आलेल्या विदेशी नागरिकांच्या दाढी का कापण्यात आल्या. यांनी तालिबानप्रमाणेच माणसाची माणुसकी संकटात आणलीय,” असाही आरोप सिंह यांनी केला.