Bihar Vidhan Sabha Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या पहिल्या टप्प्याआधी जागावाटपावरून चालू असलेला वाद आणि अंतर्गत संघर्षामुळे ‘महागठबंधन’वर बरीच टीका होत होती. दरम्यान, महागठबंधनच्या नेत्यांनी आज (२३ ऑक्टोबर) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सर्व मतभेद दूर झाल्याचं जाहीर केलं. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गहलोत यांनी पत्रकार परिषदेत महागठबंधनचा प्रमुख चेहरा जाहीर केला. ते म्हणाले, “तेजस्वी यादव हे महागठबंधनचा निवडणुकीचा चेहरा असतील. आम्ही तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहोत.”

अशोक गहलोत म्हणाले, “देशाची स्थिती गंभीर आहे. लोक चिंतेत आहेत. देश कुठल्या दिशेने जातोय आणि कुठल्या दिशेने जाणार आहे याची कोणालाच कल्पना नाही. देशाला योग्य मार्गावर आणणं आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. बिहारच्या निवडणुकीवर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. बेरोजगारी असो किंवा इतर मुद्दे, सगळ्याच बाबतीत विद्यमान सरकार अपयशी ठरलं आहे. विद्यार्थी, युवक, शेतकरी हे सगळेच चिंतेत आहेत. लोकांना आता बदल हवा आहे.”

महागठबंधन एकजूट

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम म्हणाले, “अनेक महिन्यांपासून इंडिया आघाडीच्या बैठका चालू होत्या. माध्यमांनी वेगवेगळ्या बातम्या दाखवल्या. परंतु, इतकंच सांगू इच्छितो की महागठबंधन एकजुटीने निवडणुकीत उभं ठाकलं आहे. आजचा दिवस स्वप्न सत्यात उतरवणारा ठरेल. आम्ही सगळे मिळून संपूर्ण ताकदीने पुढे जाऊ.”

जब तक भाजपा को तोड़ेंगे नहीं, छोड़ेंगे नहीं : मुकेश सहनी

विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी यावेळी म्हणाले, “गेल्या साडेतीन वर्षांपासून आम्ही आजच्या दिवसाच्या प्रतीक्षेत होतो. भाजपाने जसे आमचे आमदार फोडले, गरीबांना रस्त्यावर आणलं तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की भाजपाला तोडणार नाही तोवर सोडणार नाही. महागठबंधन मजबूत आहे. आम्ही आगामी निवडणूक जिंकून राज्यात सरकार स्थापन करू.”

महागठबंधनमधील पक्ष

राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये काही विरोधी पक्षांनी एकत्र येत महागठबंधन तयार केलं आहे. यामध्ये काँग्रेससह दीपांकर भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय-एमएल तथा मार्क्सवादी-लेनिनवादी), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय), भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम – मार्क्सवादी) आणि मुकेश साहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टीचा समावेश आहे.