तेलंगणातील हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याने २०१६ रोजी आत्महत्या केल्यानंतर देशभरात आंदोलन उभे राहिले होते. रोहित वेमुलाला न्याय देण्यासाठी अनेक आंबेडकरवादी संघटना पुढे आल्या होत्या. आता तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला मृत्यू प्रकरणाची फाईल आता बंद केली आहे. तसेच सर्व आरोपींना क्लीन चीट दिली आहे. रोहित वेमुला हा दलित नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिलाय. पोलिसांच्या या निर्णयानंतर विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारल्यानंतर तेलंगणा सरकारने याप्रकरणी पुन्हा चौकशीचे आदेश दिले आहेत. तर, रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांनीही पोलिसांवर आरोप केले आहेत. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

रोहित दलित नव्हता असा पोलिसांनी अहवाल दिला आहे, यावर राधिका वेमुला म्हणाल्या, “हे दावे खोटे आहेत. पोलिसांनी त्याची जात कशी ठरवली? जात प्रमाणपत्राच्या तपासात पोलिसांची भूमिका काय होती? आम्ही २०१७-१८ मध्ये हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. २०१९, २०२०, २०२१ मध्ये करोनामुळे तपास होऊ शकला नाही. त्यामुळे तपास पूर्ण झाल्याशिवाय हा निर्णय कसा काय घेतला गेला? हे सर्व भाजपाचं षडयंत्र आहे”, असा आरोप राधिका वेमुला यांनी केला.

रोहितला दलित मानणं राजकीय षडयंत्र

“रोहित एमएससी परीक्षेत पूर्ण भारतात पाचव्या स्थानावर होता. जेआरएफमध्ये दोनवेळा पात्र ठरला. त्याची प्रमाणपत्र खोटे नाहीयत. मी सर्व गोष्टी जनतेसमोर ठेवणार आहे. त्याला दलित न मानणं हे राजकीय षडयंत्र आहे. आम्ही सच्चे दलित आहोत”, असंही त्या म्हणाल्या.

रोहित पवार दलित होता म्हणूनच…

रोहित दलित नव्हता म्हणूनच त्याने आत्महत्या केली, अशीही चर्चा आहे, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, “जर रोहित एससी प्रवर्गातून नसता तर त्याला विद्यापीठात प्रवेश कसा मिळाला असता? त्याच्या प्रमाणपत्राच्या तपासानंतरच त्याला प्रवेश दिला गेला. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. रोहितचा मृत्यू दलिताच्या रुपात झाला आहे. तो दलित होता, म्हणूनच त्याचं विद्यापीठातून निलंबन केलं होतं. मृत्यूनंतर जातीला दोष देणं चुकीचं आहे”, असं त्या म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व दोषींना शिक्षा झालीच पाहिजे

तसंच, याप्रकरणातील तपास भाजपा आणि बीआरएसच्या लोकांव्यतिरिक्त केला गेला तर या प्रकरणात नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रोहित वेमुलाच्या मृत्यूप्रकरणात जे दोषी आहेत त्या सर्वांना शिक्षा मिळाली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं.