हरियाणा रोडवेजच्या चालत्या बसमध्ये दोन बहिणींच्या कथित छेडछाडप्रकरणात स्थानिक न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषमुक्त केले आहे. न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल जाहीर करताना तिन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केले. याप्रकरणात ४० साक्षीदारांनी या तिन्ही युवकांच्या बाजूने साक्ष दिली. लायडिटेक्टर चाचणीच्या अहवालातही तिन्ही युवक निर्दोष आढळून आले. दरम्यान, या युवकांनी या बहिणींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारी सुरू केल्याचे समजते.
हरियाणा रोडवेजच्या चालत्या बसमध्ये छेडाछाडीचे हे प्रकरण नोव्हेंबर २०१४मध्ये चर्चेत आले होते. २८ नोव्हेंबर रोजी या प्रकरणातील कथित छेडछेडीनंतर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सोनीपत येथील पुजा व आरती या बहिणी रोहतकमधील आसन गावातील तीन युवक कुलदीप, मोहित व दीपकवर छेडछाडीचा आरोप केला होता. तिन्ही युवकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना जामीनही मिळाला होता.
याचदरम्यान दोन इतर व्हिडिओही समोर आले होते. यामध्ये एका व्हिडिओत आरोपी युवक पोलीस ठाण्यात माफी मागताना दिसत होते. तर दुसऱ्या एका व्हिडिओत दोन्ही बहिणी पार्कमध्ये आणखी एका युवकाला मारहाण करताना दिसत होते. या व्हिडिओनंतर दोन्ही बहिणींच्या धाडसावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या तिन्ही युवकांनी आपल्यावरील सर्व आरोपांचा इन्कार करत आसनावर बसवण्यावरून वाद झाल्याचे सांगितले होते. आरोपी युवकांच्या समर्थनात आसनमधील ग्रामस्थ आणि बसमधील काही प्रवासीही पुढे आले होते.
रोहतकचे तत्कालीन पोलीस अधिक्षकांनी चौकशीसाठी उपअधीक्षक यशपाल खटाना यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्त केली होती. डिसेंबर २०१४ मध्ये तिन्ही आरोपी आणि दोन्ही बहिणींची पॉलिग्राफी चाचणीही घेण्यात आली. नंतर दोन्ही बहिणींनी विशेष पथकाच्या तपासावर शंका व्यक्त केली. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये दोन्ही बहिणींना चुकीचे ठरवत तिन्ही आरोपींना क्लीनचिट दिली होती.
पॉलिग्राफिक आणि फॉरेन्सिक चाचणीमध्ये तिन्ही आरोपींनी बरोबर उत्तर दिली तर दोन्ही बहिणींची उत्तरे ही भ्रम निर्माण करणारी होती. याप्रकरणी शुक्रवारी न्यायाधीश हरीश गोयल यांनी निकाल देताना तिन्ही युवकांना निर्दोष मुक्त केले.