भारतामध्ये स्त्रियांना पुरूषांकडून केल्या जाणाऱ्या मारहाणीला किंवा हिसेंच्या प्रकारांना काहीप्रमाणात भारतीय चित्रपट कारणीभूत आहे, असे वादग्रस्त मत केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्री मेनका गांधी यांनी व्यक्त केले आहे. महिलांशी हिंसक पद्धतीने वागल्यानंतरही आपण सहजपणे सुटू हा आत्मविश्वास भारतीय पुरूषांमध्ये येण्याचे मूळ कुठेतरी चित्रपटांमध्ये दडले आहे. गेल्या ५० वर्षांमध्ये चित्रपट हा भारतीय समाजापर्यंत संदेश पोहचवण्याचे सशक्त माध्यम राहिलेले आहे. आपण कोणत्याही भारतीय भाषेतील चित्रपटांवर नजर टाकल्यास बहुतांश चित्रपटात प्रेमाची सुरूवात ही छेडछाडीपासून होते. चित्रपटात नायक त्याच्या साथीदारांसोबत नायिकेच्या पाठीपाठी फिरतात, नायिकेला उद्देशून आक्षेपार्ह किंवा अश्लिल शेरेबाजी करतात, तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतात. मग हळूहळू नायिका त्याच्या प्रेमात पडत जाते. त्यानंतर नेहमीप्रमाणे नायक कोणाशी तरी भांडून तिला मिळवतो, असे चित्रपटात साधारणपणे दाखवले जाते. मात्र, या सगळ्याची सुरूवात हिंसेपासून होते. आपण आजच्या हिंदी किंवा प्रादेशिक चित्रपटांवर नजर टाकली तर लक्षात येईल की, आताचे चित्रपट कुठेतरी पन्नाशीच्या दशकातील हिंसाप्रधान चित्रपटांशी सार्धम्य साधणारे असल्याचे मेनका गांधी यांनी सांगितले.

यापूर्वीही हॉस्टेलमधील मुलींसंदर्भात केलेल्या वक्तव्यांमुळे मेनका गांधी वादात सापडल्या होत्या. हॉस्टेलमधील मुलींच्या सुरक्षेसाठी त्यांच्यावर लवकर येण्याचा ‘कर्फ्यू’ लावावा, असे त्यांनी म्हटले होते. साधारणत: १६ किंवा १७ व्या वर्षी तरूण मुले आणि मुली शरीरातील हार्मोनल बदलांना सामोरे जातात. त्यामुळे या वयातील भावनिक आवेगापासून मुलींना जपायचे असेल तर त्यांच्यावर काही बंधने घातली पाहिजेत. ही गोष्ट मुलींच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले होते.