Government school roof collapse झारखंडमध्ये सतत सुरु असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचदरम्यान रांचीमध्ये दुःखद घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे एका सरकारी शाळेच्या इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर एक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शुक्रवारी (१८ जुलै) अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, रांचीमध्ये असणार्या पिस्का मोड भागात ही दुर्घटना घडली.
एकाचा मृत्यू, एक जण अडकल्याची शक्यता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. आणखी एक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. अडकलेल्या व्यक्तीला शोधण्यासाठी आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सध्या बचाव कार्य सुरू आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) चंदू ओरांव म्हणाले, “भिंत कोसळली तेव्हा खांब नसलेल्या भिंतीजवळ मुले आणि वृद्ध होते. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत आणि त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. एक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याले त्या व्यक्तीचा मृत्यू झाला,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मृत व्यक्ती व्हरांड्यात झोपला असतान घडली घटना
सुखदेव नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी मनोज कुमार यांनी पीटीआयला माहिती दिली की, एक वृद्ध व्यक्तीशाळेच्या व्हरांड्यात झोपला होता आणि त्याचदरम्यान छताचा भाग कोसळला. अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. बचावकार्य सुरू असून अधिक तपशील समोर येतील, असे कुमार यांनी सांगितले आहे.
झारखंडमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे शाळेची इमारत कमकुवत झाली आणि कोसळली, असे मानले जात आहे. या घटनेनंतर स्थानिक अधिकारी या प्रदेशातील इतर संवेदनशील इमारतींच्या सुरक्षिततेच्या परिस्थितीचा देखील आढावा घेण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून झारखंडमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. झारखंडमधील पलामू, गढवा आणि लातेहार जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या तीन जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे, असे त्यांनी सांगितले. गुरुवारी या तीन जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे आयएमडी अधिकाऱ्याने सांगितले आहे.