सोनिया गांधींनी २००४ मध्ये पंतप्रधान व्हायला हवं होतं आणि जर त्या पद स्वीकारणार नव्हत्या, तर काँग्रेसला बळकटी देण्यासाठी शरद पवार यांना पंतप्रधान बनवायला हवं होतं असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी सोनिया गांधींच्या परदेशी असण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. “जर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकल्या, तर सोनिया गांधींही २००४ च्या निवडणुकांनंतर भारताच्या पंतप्रधान होऊ शकल्या असत्या,” असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

“जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) २००४ च्या निवडणुकीत बहुमत मिळाले, तेव्हा मी सोनिया गांधींना पंतप्रधान व्हावे असा प्रस्ताव दिला होता. माझ्या मते त्यांच्या परदेशी असण्याच्या मुद्द्याला काही अर्थ नव्हता,” असे आठवलेंनी इंदोर येथे पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.

कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती होऊ शकतात, तर सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?; केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

“जर कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात, तर राजीव गांधी (माजी पंतप्रधान) यांच्या पत्नी आणि लोकसभेत खासदार म्हणून निवडून आलेल्या सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?” असा सवालही रामदास आठवले यांनी यावेळी केला.

“पवार हे जननेते म्हणून पंतप्रधानपदासाठी पात्र होते आणि काँग्रेसने त्यांना मनमोहन सिंग यांच्या जागी पंतप्रधान बनवायला हवे होते, पण सोनिया गांधींनी तसे केले नाही. जर पवार २००४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाले असते, तर काँग्रेसला आजच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते,” असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ पर्यंत पंतप्रधान म्हणून काम केले. भाजपाने प्रचंड बहुमताने सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांची जागा घेतली.

शरद पवार हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहेत. सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्व करण्याच्या अधिकारावरून झालेल्या वादामुळे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी पीए संगमा आणि तारिक अन्वर यांच्यासह २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादीची स्थापना केली होती.