नवी दिल्ली : ‘भारती एअरटेल’ आणि तिची उपकंपनी असलेल्या ‘भारती टेलिमीडिया’ने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला २३४ कोटी रुपयांची देणगी दिल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या डेटातून समोर आले आहे. या दोन्ही कपन्यांनी एकूण २३५ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले होते. त्यापैकी तब्बल २३४ कोटी एकटया भाजपला देण्यात आले.

हेही वाचा >>> ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही झाली होती ईडी चौकशी’; भाजपाचे नेते म्हणाले, “ते नऊ तास…”

‘भारती एअरटेल’ने भाजपला १९७.५ कोटी रुपये, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सला ५० लाख रुपये आणि राष्ट्रीय जनता दलाला १० लाखांची देणगी दिली. तर ‘भारती टेलिमीडिया’ने भाजपला ३७ कोटी रुपयांची देणगी दिली. दरम्यान, बडया उद्योजक कंपन्यांनी राजकीय पक्षांना दिलेल्या मोठया रकमांच्या तुलनेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी विविध पक्षांना मिळून जवळपास १५ कोटींची देणगी दिल्याचे दिसून आले आहे.

कोटक कुटुंबाच्या मालकीची असलेल्या ‘इन्फिना फायनान्स’ या बिगर-बँकिंग वित्तीय कॉर्पोरेशन कंपनीने २०१९, २०२० आणि २०२१ या वर्षांमध्ये ६० कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले आणि ते सर्व भाजपला देणगीपोटी दिल्याचेही या आकडेवारीतून स्पष्ट होते.

हेही वाचा >>> “मोदींनी अहंकारातून…”, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी व्यक्त केला संताप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तराखंडमधील सिल्क्यारा-बारकोट बोगद्याचे बांधकाम करणाऱ्या हैदराबादस्थित ‘नवयुग इंजीनियिरग कंपनी लि. (एनईसी)’ या कंपनीने १९ एप्रिल २०१९ आणि १० ऑक्टोबर २०२२ या दरम्यान ५५ कोटींचे मूल्य असलेल्या निवडणूक रोख्यांची खरेदी करून देणगीपोटी भाजपला दिले. गेल्या वर्षी सिल्क्यारा बोगद्याचा काही भाग कोसळून ४१ श्रमिक अडकल्यामुळे ही कंपनी चर्चेत आली होती.

‘एनईसी’ने प्रत्येकी १ कोटी मूल्याचे ५५ निवडणूक रोखे खरेदी केले होते. सिल्क्यारा-बारकोट बोगदा प्रकल्पाला मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने २०१८मध्ये मंजुरी दिली होती. तो २०२२मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते.