Rs 46 crore income tax notice to dhaba cook : मध्य प्रदेशमधील भिंड जिल्ह्यातील एका ढाब्यावर स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या रविंदर सिंह चौहान यांना चक्क ४६ कोटी रुपयांची इन्कम टॅक्सची नोटीस आल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर चौहान यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

“मी एका ढाब्यावर काम करतो. माझ्या खात्यावरून संपूर्ण वर्षभरात तीन लाखांचे व्यवहार देखील होत नाहीत,” असे चौहान म्हणाले. “आम्हाला एक तक्रार मिळाली आहे आणि आम्ही पुढील कारवाईची दिशा ठरवत आहोत,” असे एका वरिष्ठ आधिकाऱ्याने चौहान यांनी दिलेल्या तक्रारीबद्दल सांगितले.

पीडित व्यक्तीचे वकील प्रधुमन सिंह भादोरिया यांनी दावा केला की नोव्हेंबर २०१९ मध्ये जेव्हा चौहान हे ग्वालेर बायपासवरील एका टोल प्लाझा येथील एका मेसमध्ये मदतनीस म्हणून काम करत होते तेव्हा सुपरव्हायजरने त्यांना बँकेचे डिटेल्स आणि आधार कार्डची माहिती प्रोव्हिडंट फंडसाठी देण्यास सांगितली होती.

हे डिटेल्स तुम्ही का दिले असे विचारले असता चौहान म्हणाले की, “मला कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमुळे इयत्ता सहावीनंतर शाळा सोडावी लागली होती”.

आठ महिने झाले तरी आपल्याला पीएफचे पैसे किंवा इतर भत्ते मिळाले नाहीत आणि बँक खाते आपल्याला बंद करता न आल्याचा दावा चौहान यांनी केला. टोल नाक्याचा करार संपल्यानंतर २०२३ मध्ये त्यांची नोकरी गेली, त्यामुळे त्यांना पुणे येथे कामाच्या शोधात जावे लागले.

आयकर विभागाची पहिली नोटीस चौहान यांच्या घरी ९ एप्रिल २०२५ रोजी आली, जी इंग्रजीत लिहिलेली होती. त्यांना किंवा त्यांच्या पत्नीला ती लक्षात आली नाही त्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर २५ जुलै रोजी दुसरी नोटीस आली आणि त्यानंतर चौहान यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले.

ग्वाल्हेर येथील आयकर विभागाने पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “आर्थिक वर्ष २०२०-२१ आणि असेसमेंट इयर २०२१-२२ साठी, ४६,१८,३२,९१६ रुपयांचे करपात्र उत्पन्न टॅक्स असेसमेंटमधू वगळले गेले आहे. त्यामुळे करदात्याची केस नोटीस पाठवण्यासाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे.”

एक महिन्यापेक्षा जास्त काळ वकिलाबरोबर चर्चा केल्यानंतर अखेर चौहान यांनी नेमकं काय घडलं याबद्दल माहिती दिली. “सात वर्षांपूर्वी उघडलेले हे खाते सातत्याने मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जात होते,” असा दावा त्यांनी केला.

“मी बंद करण्याची विनंती करूनही कोणीतरी ते सतत वापरत राहिले,” असा दावा त्यांनी केली. “मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, पण ते मला सांगत आहेत की गुन्हा दिल्लीत झाला आहे, त्यामुळे मी तिथे एक तक्रार दाखल केली पाहिजे.”