अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आज (शुक्रवार) राज्यसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. आज सकाळी राज्यसभेच्या कामकाजाला सुरूवात होताच, अध्यक्ष हमीद अंसारी यांनी २० ऑगस्ट रोजी पुण्यात झालेल्या दाभोलकांच्या हत्येचा उल्लेख करत त्यांना श्रध्दांजली वाहिली.
दाभोलकर हे व्यवसायाने डॉक्टर होते, परंतू त्यांनी आपले आयुष्य सामाजिक न्याय, अंधश्रध्दा निर्मूलन, प्राणीहत्या आणि पिण्याच्या पाण्याच्या लढ्यासाठी व्यथित केले, असं अन्सारी म्हणाले.
गुरूवारी राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यावर प्रश्नोत्तराच्या तासावेळी लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डी. पी. त्रिपाठी यांनी या विषयावर बोलण्यासाठी परवानगी मागितली होती.
दाभोलकर यांच्या जाण्याचे सभागृहाला अतिशय दु:ख झाले असून त्यांच्या जाण्याने देश एका खंद्या सामाजिक कार्यकर्त्याला मुकला आहे, असं हमीद अन्सारी म्हणाले. त्यानंतर सभागृहातील सर्व सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळून दाभोलकरांना श्रद्धांजली वाहिली.