Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी दिल्लीमध्ये आयोजित ‘संघाचा १०० वर्षांचा प्रवास – नवे क्षितीज’ या कार्यक्रमात बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं. राष्ट्रीय एकता, हिंदू राष्ट्र, स्वातंत्र्यानंतर संघाची गरज, हिंदू म्हणजे नेमकं कोण? यासह आदी महत्वाच्या विषयांवर मोहन भागवत यांनी आपले विचार व्यक्त केले.
याच कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक मोठं विधान केलं. ‘सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे’, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. तसेच हिंदू राष्ट्राचा अर्थ कोणालाही वगळणे असा नाही, आपण हिंदू राष्ट्र म्हणतो आणि आपण एखाद्याला वगळत असू तर हे बरोबर नाही, असं मतही मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केलं. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
“हिंदू असणं म्हणजे इतरांच्या विरुद्ध आहे असं नाही, तर हिंदू म्हणजे सर्वसमाविष्ट असा आहे. आपण हिंदू म्हणतो, पण ते कधीही हिंदू विरुद्ध सर्व असं नसतं. हिंदूचं स्वरूप समन्वयात असतं, संघर्षात नाही”, असं म्हणत भारत अविभाजित आहे आणि विविधतेत एकता ही आपली खरी ताकद आहे”, असं या कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
“भारत मातेची भक्ती आणि सर्वांसाठी समान असलेल्या पूर्वजांच्या परंपरा हे आपल्या ओळखीचे प्रमुख घटक आहेत. आपला डीएनए देखील सारखाच आहे. सुसंवादाने राहणं ही आपली संस्कृती आहे. प्राचीन काळापासून भारतीयांनी कधीही लोकांमध्ये भेदभाव केला नाही. हिंदू नाव आपल्याला बाहेरील लोकांनी दिलं. पण आपण कधीही भेदभाव केला नाही. आपल्या देशांत अनेक धर्म होते. मात्र, प्रत्येकाचा स्वभाव स्वीकारणाऱ्याला हिंदू म्हटलं जात असे. इतरांच्या श्रद्धेचा देखील आदर केला पाहिजे, त्यांचा अपमान केला नाही पाहिजे”, असं मोहन भागवत म्हणाले आहेत.
" Who is a Hindu ?" explains Dr. Mohan ji Bhagwat. #संघयात्रा pic.twitter.com/wJK3YUc0JE
— RSS (@RSSorg) August 26, 2025
‘तसेच १०० वर्षानंतरही संघ नव्या क्षितिजावर आहे. त्याचं कारण म्हणजे भारत. भारताला विश्वगुरू करण्यासाठीच संघाची निर्मिती झाली, भारताने विश्वात मोठं योगदान देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. विश्वात भारताला अग्रगण्य स्थान मिळालं पाहिजे. ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७५ वर्षांत भारताला अपेक्षित दर्जा मिळू शकलेला नाही. भारताच्या उदयासाठी सामाजिक परिवर्तनाची गरज आहे’, असंही मोहन भागवत म्हणाले आहेत.