नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात, सप्टेंबरमध्ये ७५ वर्षांचे झाल्यानंतर त्यांना संघ निवृत्त करेल अशी चर्चा सत्तेच्या वर्तुळात रंगली असताना, सरसंघचालक मोहन भागवत यांनी, ‘संघ कोणालाही सक्तीने निवृत्त करत नाही. त्यामुळे ना मी निवृत्त होणार, ना इतर कोणाला निवृत्त होण्यास सांगितले जाईल,’ असे गुरुवारी विज्ञानभवनातील कार्यक्रमात स्पष्ट केले.

नागपूरमधील एका कार्यक्रमामध्ये भागवत यांनी‘ ७५ वर्षानंतर कोणाचा पाठीवर शाल घालून सत्कार होत असेल तर त्याची निवृत्तीची वेळ आली असे समजावे’ असे मिश्किल विधान केले होते. त्याकडे राजकीय अर्थाने पाहिले गेले. मोदी यांनाही वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानपदावरून पायउतार होण्यास सांगितले जाईल, अशी चर्चा सुरू झाली. मोहन भागवत हेदेखील सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षांचे होत असल्याने तेही निवृत्त होणार का, असा प्रश्न त्यांना विज्ञानभवनातील व्याख्यानमालेत विचारण्यात आला. त्यावर भागवत म्हणाले,‘संघामध्ये असा कोणता नियम नाही. संघामध्ये कोणी निवृत्त होत नसतो, संघ जोपर्यंत सांगतो तोपर्यंत स्वयंसेवक कार्यरत राहतात. मला ८० व्या वर्षी संघाने शाखा चालवण्यास सांगितले तर ते काम आनंदाने करेन.’‘

संघाचा १०० वर्षांचा प्रवास: नवे क्षितीज या विषयावर सरसंघचालक मोहन भागवत यांच्या तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. भागवत यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना तब्बल अडीच तास समर्पक उत्तरे दिली.‘संघ भाजपला नियंत्रित करत नाही. त्यांनी मदत मागितली तर आम्ही देतो. तसे आम्ही कोणालाही मदत करायला तयार असतो. संघ चालवण्याचे कौशल्य आमच्याकडे आहे. भाजपकडे राजकारण करण्याचे व सत्ता चालवण्याचे कौशल्य आहे. भाजपचे निर्णय संघ घेत असता तर भाजपमध्ये निर्णय घ्यायला इतका वेळ लागला असता का, आम्ही निर्णय कधीच घेतला असता,’ अशी टोलेबाजी भागवत यांनी केली.

संविधानातील आरक्षणाला पाठिंबा

संविधानाने ज्या समाजांना आरक्षण दिले आहे, ते कायम राहिले पाहिजे. या आरक्षणाच्या तरतुदीला संघाचा पाठिंबा होता व राहील. जोपर्यंत या आरक्षणाची गरज असेल तोपर्यंत आरक्षण असले पाहिजे.

हम दो, हमारे तीन…

लोकसंख्यावाढ व विकासातील योगदान यासंदर्भातील प्रश्नावर भागवत म्हणाले की, देशातील लोकसंख्या कमी होऊ नये व ती स्थिर राहावी यासाठी प्रत्येक कुटुंबात किमान तीन मुले जन्माला आली पाहिजेत. भारतातील जन्मदर २.१ टक्का आहे. हा दर त्यापेक्षा खाली गेला तर लोकसंख्या कमी होत जाईल. हिंदूंमधील जन्मदर वेगाने कमी झाला असून मुस्लीम व इतर समाजातील जन्मदरही कमी होऊ लागला आहे. त्यामुळे किमान तीन अपत्ये जन्माला घातली पाहिजेत.