RSS Chief Mohan Bhagwat on India Pakistan Relations : काश्मीरमधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारत व पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी पाकिस्तानच्या वृत्तीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, “भारत नेहमीच शांततेसाठी पुढाकार घेत आला आहे. परंतु, पाकिस्तान सातत्याने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतोय.”
बंगळुरूमध्ये आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्याख्यानमालेत भागवत सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालकांनी भारताचा शेजारी देश पाकिस्तानला कठोर इशारा देत म्हटलं आहे की “भारत प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास सज्ज आहे.”
“भारताचा शांततेसाठी पुढाकार, पण पाकिस्तानला कदर नाही”
मोहन भागवत म्हणाले, “भारताला पाकिस्तानबरोबर शांतता हवी आहे. भारत शांततेसाठी पुढाकार घेतो. मात्र, पाकिस्तानला त्याची कदर नाही.” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त संघाने बंगळुरूमध्ये दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली आहे. यावेळी भागवत म्हणाले, भारताने अनेकदा शांततेसाठी प्रयत्न केले आहेत. परंतु, पाकिस्तान सातत्याने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतोय.
…तोवर पाकिस्तानच्या कुरघोड्या चालू राहतील : भागवत
“भारताला केवळ शांतता हवी आहे. परंतु, पाकिस्तानला त्यातून समाधान मिळत नाही. भारताचं नुकसान करून पाकिस्तानला मजा येते, त्यातून त्यांना समाधान मिळतं. त्यांना ही मजा येत राहील तोवर पाकिस्तानच्या कुरघोड्या चालू राहतील.”
पाकिस्तानला समजेल अशा भाषेत उत्तर द्यावं लागतं : सरसंघचालक
“भारताकडून भांडण सुरू होता कामा नये. पाकिस्तानने सामंजस्य करार मोडला तर त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगावी लागतील. ते भारताचं नुकसान करण्याचा जितका प्रयत्न करतील तितकं त्यांचंच नुकसान होईल. मुळात पाकिस्तानला शांततेची भाषा समजत नाही. त्यामुळे त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर द्यावं लागतं. त्यांना कळत नाहीये की ते भारताचं काही वाकडं करू शकत नाहीत. तरी ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे पाकिस्तानला समजेल अशा भाषेत उत्तर द्यावं लागतं.”
“…तर पाकिस्तानला १९७१ सारखा धडा मिळेल”
मोहन भागवत यांनी यावेळी १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धाचा दाखला दिला. ते म्हणाले, “१९७१ मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना मोठा पराभव पाहावा लागला. त्यावेळी पाकिस्तानने त्यांचं ९० हजार सैनिकांचं पूर्ण लष्कर गमावलं होतं. पाकिस्तानच्या या अशा कारवाया चालू राहिल्या तर त्यांना पुन्हा एकदा चांगला धडा मिळेल.”
सरसंघचालक म्हणाले, “पाकिस्तानच्या अशा कारवायांमुळे भारताने नेहमी सतर्क राहिलं पाहिजे. भारताला पाकिस्तानच्या प्रत्येक प्रयत्नाविरोधात तयार राहावं लागेल. प्रत्येक वेळी त्यांना सडेतोड उत्तर मिळालं पाहिजे, जेणेकरून कधीतरी त्यांना पश्चाताप होईल. त्यातून एक दिवस असा येईल की पाकिस्तानला अक्कल आलेली असेल आणि पाकिस्तान सहकार्याची भाषा बोलू लागेल. कारण त्यातच त्यांच भलं आहे.”
