राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. मांस खाणे हा रोग असल्यामुळे मुस्लिमांनी मांस खाणे सोडून द्यायला हवे, असे विधान त्यांनी केले आहे. दिल्लीच्या जामा मिलिया इस्लामिया विद्यापीठात सोमवारी रमजाननिमित्त आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत त्यांनी अनेक मुक्ताफळे उधळली. यावेळी त्यांनी मांस खाणे हा एकप्रकारचा रोग असल्यामुळे मुस्लिमांनी ही सवय सोडून द्यावी, असे अजब आवाहन त्यांनी केले.

इफ्तार पार्टीच्या या कार्यक्रमात इंद्रेश कुमार यांनी भाषण करताना इंद्रेश कुमार यांनी म्हटले की, माझी मुस्लिम समाजाला तीन आवाहने आहेत. पहिलं आवाहन म्हणजे मुस्लिमांनी रमजानच्या काळात त्यांच्या परिसरात, गल्लीत, मस्जिद आणि दर्गा अशा सर्व ठिकाणी झाडे लावावीत. जेणेकरून प्रदुषणाला आळा बसून पर्यावरणाचे रक्षण होईल. दुसरी गोष्ट म्हणजे मुस्लिमांनी त्यांच्या घरात तुळशीचे रोपटे लावावे. अरबी भाषेत तुळशीला ‘जन्नत का झाड’ म्हटले असून त्यामुळे जन्नत प्राप्त होते, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले. तिसरी गोष्ट म्हणजे मुस्लिमांनी मांस खाणे सोडून द्यावे. प्रेषित आणि त्यांच्या अनुयायांनी कधीच मांस सेवन केले नव्हते. मांस खाणे हा एकप्रकारचा रोग आहे. तर दूध हे औषध आहे. त्यामुळे मुस्लिमांनी त्यांच्या सरबतात दूध घालावे, असे कुमार यांनी म्हटले.

‘व्हॅलेंटाईन्स डे’मुळे भारतात बलात्कार वाढले- इंद्रेश कुमार

कुमार यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे इफ्तार पार्टीचा कार्यक्रम साहजिकच वादग्रस्त ठरला. मुळात इंद्रेश कुमार यांना इफ्तार पार्टीला बोलवल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गेटबाहेर जोरदार निदर्शनेही केली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना मारहाण आणि अटक करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जामा मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे कुलगुरू तलत अहमद हेदेखील उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले.

‘आरएसएस’चा अजेंडा राबवण्यासाठी ३०० मौलवी एकत्र, मुसलमानांना सांगणार गायीचे फायदे