इस्लाम धर्मातील कट्टर विचारसरणीच्या वहाबी पंथीय दहशतवाद्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून भारतातील मुस्लिम युवकांमध्ये दहशतवादी संघाटनांमध्ये सामील होण्याचा किंवा फुटीरतावादी विचारसरणीचा ओढा निर्माण होण्याचा धोका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(आरएसएस) मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ने व्यक्त केला आहे. हा धोका टाळण्यासाठी अल्पसंख्याक समाजाने आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा यासाठी देशातील मुस्लिम नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजेत यातूनच अल्पसंख्याकांचा विकास देखील साधता येईल, असा सल्लाही ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकात प्रकाशित झालेल्या लेखातून देण्यात आला आहे.
देशातील तरुणांमध्ये देशविरोधी भावना निर्माण होणार नाही याची सावधगिरी सरकार आणि मुस्लिम नेत्यांनी बाळगण्याची गरज असून या समस्येला दुर्लक्षित करणे देशाला महागात पडू शकते. देशात कट्टर विचारसरणीला बढावा देणारे संभाव्य घटक ओळखून सरकारने त्यावर उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे, लेखात नमूद करण्यात आले आहे. जागतिक स्तरावर मुस्लिम धर्मीय लोकसंख्या सर्वात जास्त वेगाने वाढत असल्याचा अहवाल काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला होता. सर्वात वेगाने वाढत असलेला मुस्लिम धर्म २०७० सालापर्यंत ख्रिश्चनांना मागे टाकून सर्वात जास्त लोकसंख्या असलेला धर्म होणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते. या अहवालाचा दाखला देत मध्य आशियातील मुस्लिमांसारखी कट्टर विचारसरणी सध्या भारतीय मुस्लिमांमध्ये नसली तरी दहशतवाद ही जागतिक समस्या वाढत असल्याचे नाकारता येणार नाही, अशीही नोंद लेखात करण्यात आली आहे