दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशात भाजपकडून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे ‘सामान्य ज्ञान’ तपासण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेसाठी ७० पानांची पुस्तिका तयार करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील लाखो मुलांना ही पुस्तिका देण्यात आली असून यामधील प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत. या पुस्तिकेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय संघाच्या अनेक नेत्यांचा उल्लेख यामध्ये महापुरुष म्हणून करण्यात आला आहे. मात्र पंडित जवाहरलाल नेहरु आणि महात्मा गांधींचा उल्लेख करताना ‘महापुरुष’ या शब्दाचा वापर टाळण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपकडून इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी भाजपकडून पुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे. या पुस्तिकेमध्ये वीर सावरकर, दिनदयाळ उपाध्याय, के. बी. हेडगेवार, श्यामा प्रसाद मुखर्जी, नानाजी देशमुख आणि संघाच्या इतर नेत्यांची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच राष्ट्रवाद, हिंदुत्व यांबद्दलची माहितीदेखील या पुस्तिकेमध्ये आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेखदेखील यामध्ये आहे. या पुस्तिकेतील माहितीवरुनच विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रश्न विचारले जाणार आहेत.

स्वामी विवेकानंद यांनी १८९३ च्या शिकागोमधील जागतिक धर्म संमेलनात ‘हिंदुत्वाचे’ प्रतिनिधीत्व केले होते, असा उल्लेख भाजपकडून छापण्यात आलेल्या ७० पानी पुस्तिकेत आहे. याशिवाय भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांचा उल्लेख यामध्ये ‘महापुरुष’ म्हणून करण्यात आला आहे. मात्र जवाहरलाल नेहरु आणि महात्मा गांधी यांच्यासाठी ‘महापुरुष’ हा शब्द वापरण्यात आलेला नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशात २६ ऑगस्टला विविध परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान तपासणारी परीक्षा घेण्यात येईल. खासगी शाळांमधील बहुसंख्य विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. या परीक्षेत १०० वस्तूनिष्ठ प्रश्न विचारले जाणार आहेत. यासाठी ९० मिनिटे विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून परीक्षेसाठी ५ रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे. या परीक्षेच्या नाव नोंदणीसाठी  १६ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss stalwarts regarded mahapurush in up handbook
First published on: 03-08-2017 at 18:58 IST