नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शनिवारी (२३ जानेवारी २०२१ रोजी) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान जय श्रीरामच्या घोषणा देण्याच्या घटनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही नाराजी व्यक्त केली आहे. कोलकात्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या व्यक्ती कोण होत्या त्यांची ओळख पटवून त्यांना शोधून काढले पाहिजे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हटलं आहे.

नक्की काय घडलं?

१२५व्या जयंतीवर्ष प्रारंभानिमित्त कोलकात्यामधील व्हिक्टोरिया मेमोरियल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या कार्यक्रमामध्येच प्रेक्षकांतून ‘जय श्रीराम’ची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारानंतर ममता इतक्या खवळल्या की, त्यांनी भाषण करण्यास नकार दिला. सरकारी कार्यक्रमात असा अवमान करणे चुकीचे, असे ममतांचे म्हणणे होते. हा कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाहीय त्यामुळे या कार्यक्रमाचा सन्मान केला पाहिजे, असंही ममता म्हणाल्या. अशापद्धतीने कार्यक्रमाला आमंत्रित करुन एखाद्याचा अपमान करणं योग्य नसल्याचंही ममता यांनी म्हटलं.

ममता म्हणाल्या, “आम्ही फक्त निवडणूक असेल तेव्हा…”

त्या दिवशी अन्य एका ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये ममतांनी घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. “केवळ निवडणुका असणाऱ्या वर्षांमध्ये आम्ही नेताजींची जयंती साजरी करत नाही. आम्ही खूप मोठ्या प्रमाणात नेताजींची १२५ वी जयंती साजरी करत आहोत. ते देशातील एक थोर स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक होते. ते महान नेते आणि देशाला दिशा दाखवणारं नेतृत्व होतं,” असं ममता म्हणाल्या. ममता यांनी त्याच दिवशी ट्विटरवरुन नेताजी आणि आझाद हिंद सेनेच्या नावाने अनेक विकास कामांची घोषणाही केली.

आरएसएसची भूमिका काय?

आता याच प्रकरणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका स्पष्ट केलीय. आरएसएसने या प्रकरणामध्ये घोषणा देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेताला जावा अशी मागणी भाजपाकडे केली आहे. हा कार्यक्रम एका महान स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये जय श्रीरामच्या घोषणा देण्याचं समर्थन संघ करत नाही. पश्चिम बंगालचे संघाचे महासचिव जिश्नू बासू यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली. “घडलेल्या प्रकारामुळे संघ नाराज आहे. ज्या लोकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या ते नेताजींचाही समन्मान करत नाहीत आणि त्यांना श्री रामाबद्दलही आस्था नाही,” असं बासू यांनी म्हटलं आहे.