राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी मला एका मंदिरात जाण्यापासून रोखले, असा आरोप करीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा केंद्रातील भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर टीका केली. याच पद्धतीने भाजपचे सरकार लोकांमध्ये दुजाभाव करते आणि त्यांची हीच पद्धती अजिबात स्वीकारण्याजोगी नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
आसाम दौऱ्यावर असताना बारापेटामधील एका मंदिरात मी जात होतो. त्यावेळी मंदिराबाहेरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी मला महिलांच्या मदतीने मंदिरात जाण्यापासून रोखले, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. हीच भाजप सरकारची काम करण्याची पद्धत आहे, असाही आरोप त्यांनी केला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केरळमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला तेथील मुख्यमंत्री ओमान चंडी यांना निमंत्रित न केल्यावरूनही राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. ही कृती म्हणजे केरळमधील सर्व लोकांचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसच्या सदस्यांकडून सोमवारी सकाळी संसदभवन परिसरात विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये राहुल गांधी यांनीही भाग घेतला होता.