Udaya Kumar designed Rupee symbol : तमिळनाडू सरकार व केंद्र सरकार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावरून वाद चालू आहे. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण, तमिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या ₹ या चिन्हाऐवजी तमिळ भाषेतील रुबई (तमिळमध्ये रुपये) चं नवं चिन्ह (ரூ) वापरलं आहे. तमिळनाडू सरकारने तमिळमध्ये रु (ரூ) हे अक्षर रुपयाचं चिन्ह म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे.

भाषेवरून राजकारण करणाऱ्या तमिळनाडूमधील द्रमुक सरकारने केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या रुपयाच्या चिन्हालाच एक प्रकारे आव्हान दिलं असलं तरी एका गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही, ते म्हणजे रुपयाचं ₹ हे चिन्ह एका तमिळ माणसानेच बनवलं आहे. विशेष म्हणजे द्रमुक नेत्याच्या मुलानेच हे चिन्ह साकारलं आहे. ₹ हे चिन्ह साकारणारे उदयकुमार धर्मलिंगम यांचे वडील द्रमुकचे नेते व आमदार होते.

तमिळ माणसानेच बनवलंय रुपयाचं चिन्ह

उदयकुमार धर्मलिंगम (Udayakumar Dharmalingam) हे भारतातील प्रसिद्ध डिझाइनर आहेत. त्यांनीच रुपयाचं ₹ हे चिन्ह डिझाइन केलं होतं. उदयकुमार यांचा जन्म १० ऑक्टोबर १९७८ रोजी तमिळनाडूमधील कल्लाकुरिची येथे झाला होता. ते सध्या तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथे वास्तव्यास आहेत. तसेच ते आयआयटी गुवाहाटीमध्ये प्राध्यापक म्हणून अध्यापनाचं काम करत आहेत.

उदयकुमार धर्मलिंगम यांचे वडील एन. धर्मलिंगम हे द्रमुकचे आमदार होते. तर, उदयकुमार हे देशातील एक प्रसिद्ध डिझाइनर आहेत. २०१० मध्ये रुपयाचा लोगो तयार करण्यासाठी देश पातळीवर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत उदयकुमार यांच्या लोगोने बाजी मारली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेसह केंद्र सरकारने रुपयाचं ₹ हे चिन्ह भारतीय चलनाचा अधिकृत लोगो म्हणून वापरण्यास मान्यता दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उदयकुमार यांच्या वडिलांची काय प्रतिक्रिया होती?

द्रमुकचे नेते व उदयकुमार यांचे वडील एन. धर्मलिंगम त्यावेळी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की “हा क्षण माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. माझ्या मुलाने तमिळनाडूच्या गौरवात आणखी भर टाकली आहे.” मात्र तेच चिन्ह आज तमिळनाडूच्या सरकारने नाकारत स्वतःचं नवं चिन्ह अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांमध्ये वापरलं आहे.