एपी, कीव्ह 

रशियाने युक्रेनवर २०२२ मध्ये आक्रमण केल्यानंतर आतापर्यंतचा सर्वात घातक ‘ड्रोन’ हल्ला शनिवारी युक्रेनची राजधानी कीव्हवर केला. युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी हा दावा केला आहे.युक्रेनच्या हवाई दलाचे कमांडर मायकोला ओलेश्चुक यांनी त्यांच्या ‘टेलिग्राम’वर नमूद केले की, रशियाच्या हल्ल्यांमध्ये प्रामुख्याने कीव्हला लक्ष्य केले गेले. युक्रेनच्या सशस्त्र दलांनी सांगितले की, रशियाने सुमारे ७५ इराणनिर्मित ‘शाहेद ड्रोन’सह युक्रेनवर हल्ला केला. त्यापैकी ७१ ‘ड्रोन’ पाडण्यात यश मिळाले आहे. कीव्ह शहर प्रशासनाचे प्रमुख सेर्ही पोप्को यांनी सांगितले की, कीव्हवर ‘ड्रोन’द्वारे करण्यात आलेला हा सर्वात प्राणघातक हवाई हल्ला होता. हा हल्ला स्थानिक वेळेनुसार पहाटे चारच्या सुमारास सुरू झाला. तो सहा तासांपेक्षा जास्त काळ चालला. ते म्हणाले की, हल्ल्यामुळे ७७ निवासी इमारती आणि १२० कार्यालयांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.

हेही वाचा >>>Mahua Moitra Bribery Case : महुआ मोईत्रांची सीबीआय चौकशी सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कीव्हचे महापौर व्हिटाली क्लिश्चको यांनी सांगितले की, शहरात काही तास सुरू असलेल्या या ड्रोन हल्ल्यात किमान पाच नागरिक जखमी झाले असून अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. जखमींमध्ये एका ११ वर्षांच्या मुलाचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. युक्रेनचे अध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांनी ‘टेलिग्राम’वर नमूद केले की, आमच्या सैनिकांनी बहुतेक ‘ड्रोन’ पाडले. आम्ही आमचे हवाई संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी आणि ‘ड्रोन’ पाडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत.

‘होलोडोमोर मेमोरियल डे’लाच आघात

‘होलोडोमोर मेमोरियल डे’च्या दिवशी सकाळी हा हल्ला करण्यात आला. १९३२ ते १९३३ या काळात तत्कालीन सोव्हिएत संघातील युक्रेनमधील मानवनिर्मित भीषण दुष्काळ-टंचाईमुळे लाखो युक्रेनियन लोकांचे बळी गेले होते. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हा स्मरण दिन पाळला जातो. नोव्हेंबरमधील चौथ्या शनिवारी हा  स्मृतिदिन असतो.