Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरोधात पाठिंबा मिळवायला सुरुवात केली असून त्यामध्ये आता रशियाचाही समावेश झाला आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी रशियाने भारताला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला असून त्यामुळे भारताच्या लढ्याला आता मोठं बळ मिळालं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला. नरेंद्र मोदींना पहलगामनंतर फोन करणारे रशियाचे पुतिन हे १८ वे जागतिक नेते आहेत.

२२ एप्रिलला पहलगामचा हल्ला

२२ एप्रिलला पहलगाम या ठिकाणी चार दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांवर हल्ला केला. या घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला. चार दहशतवाद्यांनी धर्म विचारुन लोकांना ठार केलं. २६ पुरुष पर्यटकांना या हल्ल्यात ठार करण्यात आलं. भारतासह संपूर्ण जगाने या घटनेचा निषेध नोंदवला. आता भारताने या प्रकरणी पाकिस्तानला उत्तर द्यावं अशी जनभावना आहे. पहलगाम हल्ल्याला १० दिवसांहून अधिक काळ उलटून गेला आहे. दरम्यान भारताकडून काय उत्तर दिलं जातं याकडे जगाचं लक्ष आहे. ANI च्या वृत्तानुसार व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. हा हल्ला अत्यंत निंदनीय आहे. भारताने कठोर पावलं उचलावीत आम्ही भारताच्या बाजूने आहोत असं पुतिन यांनी म्हटलं आहे.

पुतिन यांनी भारताला जाहीर केला पाठिंबा

भारतातील दहशतवादी हल्ल्यामध्ये जे कुणी सामील असतील त्यांना कठोर शिक्षा मिळावी असं मत पुतीन यांनी व्यक्त केलं. दहशतवाद तसेच इतर अनेक गोष्टींवर भारत आणि रशिया एकत्र मिळून काम करतील असा विश्वासही पुतीन यांनी मोदींना दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिचाच्या ८० व्या स्थापना दिवसाच्या पुतीन यांना शुभेच्छा दिल्या. या वर्षाच्या शेवटी भारतात शिखर संमेलन पार पडणार असून त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या पुतीन यांना आमंत्रण दिलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशिया -युक्रेन युद्ध्याच्या पार्श्वभूमीवर वॉरंट जारी केल्यानंतर पहिल्यांदाच पुतिन भारतात येणार आहेत. या आधी भारतात झालेल्या G 20 परिषदेला पुतिन अनुपस्थित राहिले होते. नरेंद्र मोदींनी स्वतःच पुतिन यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे.

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी रशियाकडे मदतीची याचना केली होती. भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेविरोधात पाकिस्तानला पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी पुतीन यांच्याकडे केली होती. पण रशियाने पाकिस्तानच्या मागणीला कोणतीही भीक घातली नाही. त्याउलट रशियाने भारताच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोरील अडचणीत वाढणार हे निश्चित मानलं जातं आहे.