नवी दिल्ली : भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेने लादलेल्या वाढीव आयातशुल्कामुळे कोणतेही आव्हान उभे राहिल्यास त्याचा सामना करण्यासाठी आमच्याकडे विशेष यंत्रणा आहे, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले. रशियाच्या भारतातील दूतावासातील स्थायी कार्यदूत रोमन बाबुश्किन यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना या मुद्दय़ावर आपल्या देशाची भूमिका स्पष्ट केली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी भारतीय मालावर २५ टक्के आयातशुल्क लागू केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याबद्दल आणखी २५ टक्के आयातशुल्क लागू केले. या ५० टक्के आयातशुल्कामुळे भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

भारत आणि रशियादरम्यानच्या संबंधांवर भाष्य करताना बाबुश्किन म्हणाले की, ‘‘विविध लष्करी उपकरणे खरेदी करण्यासाठी रशिया ही भारताची स्वाभाविक निवड आहे. तसेच अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होत आहेत.’’ रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवण्यासाठी अमेरिकेने सातत्यावर भारतावर दबाव टाकणे अन्यायकारक आहे असे बाबुश्किन म्हणाले. जागतिक आर्थिक स्थैर्य आणि ऊर्जा सुरक्षितता यादृष्टीने, रशियावर र्निबध टाकण्याचा अमेरिकचा दृष्टिकोन घातक आहे असेही त्यांनी सांगितले.

भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव

भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले नाही तर आणखी आयातशुल्क लागू केले जातील, असा इशारा अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी गेल्या आठवडय़ात दिला आहे. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश असून पहिल्या क्रमांकावर चीन आहे. मात्र, अमेरिकेने चीनविरोधात कोणतेही पाऊल उचललेले नाही.

भारतासाठी ही आव्हानात्मक भूमिका आहे. भारत-रशिया संबंध विश्वासावर आधारलेले आहेत. ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये कोणतेही आव्हान निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.  – रोमन बाबुश्किन, रशियाचे भारतातील स्थायी कार्यदूत