Russia on Peter Navarro Statement: भारतावर अमेरिकेकडून कालपासून ५० टक्के आयातशुल्क लागू झाल्यानंतर व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी दावा केला होता की, भारताने रशियाकडून तेलाची आयात करणे बंद केल्यास त्यांच्यावरील २५ टक्के टॅरिफ लगेच कमी केले जाऊ शकते. तसेच भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळेच रशियाच्या आक्रमकतेला चालना मिळाली. त्यामुळे हे (रशिया-युक्रेन) एकप्रकारे ‘मोदी युद्ध’ आहे, असा दावा पीटर नवारो यांनी केला होता. रशियाने त्यांचा हा दावाही खोडून काढला आहे.
रशियन दुतावासातील अधिकाऱ्याने काय म्हटले?
पीटर नवारो यांच्या दाव्याला रशियाने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतातील रशियन दूतावासाचे प्रथम सचिव यांनी टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. भारताकडून तेलाच्या बदल्यात मिळालेले पैसे युद्धात वापरले जात असल्याच्या दावा त्यांनी फेटाळून लावला.
“जर तेल स्वस्त आहे, तर तुम्हीही विकत घ्या. हा भारत आणि आमच्यातील आर्थिक संबंधाचा भाग आहे. यातून युद्धाला कोणताही निधी पुरवला जात नाही. दोन्ही देश आपल्यातले आर्थिक संबंध पुढेही कायम ठेवतील”, असे रशियाच्या राजनैतिक अधिकाऱ्याने म्हटले. भारताचे पैसे युद्धात वापरले जात नाहीत, हे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेची मानसिकता बदलली नाही
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबविण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केले जात असल्याबाबत रशियन अधिकाऱ्याने समाधान व्यक्त करतानाच ट्रम्प प्रशासनावर मात्र टीका केली. ते म्हणाले, अमेरिका शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेत आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. पण ट्रम्प हे जास्तच माध्यम प्रेमी आहेत. अमेरिकेने अनेक देशांसाठीचे धोरण बदलले असले तरी त्यांची मानसिकता मात्र तशीच जुनाट आहे.
पीटर नवारो काय म्हणाले होते?
ब्लूमबर्ग टेलिव्हिजनच्या बॅलन्स ऑफ पॉवरला दिलेल्या मुलाखतीत व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी रशिया-युक्रेन संघर्षाचा उल्लेख करत म्हटले की, “शांततेचा मार्ग अंशतः नवी दिल्लीतून जातो”. भारताने जर आज रशियाकडून तेल आयात थांबवली तर आम्ही उद्या लगेच त्यांच्यावरील २५ टक्के आयातशुल्क रद्द करू.
भारताच्या टॅरिफबाबतच्या भूमिकेबद्दल नावोरो नाराजी व्यक्त करत म्हणाले, “माझ्यासाठी त्रासदायक बाब म्हणजे भारतीय या बाबतीत खूप उद्धटपणे वागत आहेत. ते म्हणत आहेत की, “आम्ही कुठे जास्त टॅरिफ आकारतो? हे आमचे सार्वभौमत्व आहे. आम्ही ज्याच्याकडून हवे त्याच्याकडून तेल खरेदी करू शकतो. ठिक आहे, तुम्ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहात, पण तसे वागा.”