Russia On Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क लादलं आहे. दक्षिण कोरिया, जपान, भारत, चीन अशा अनेक देशांवर टॅरिफ लागू केलेलं आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अनेक देशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे काही देशांनी ट्रम्प यांच्याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर ट्रम्प यांनी मागील काही दिवसांपूर्वी भारत आणि चीनला टॅरिफच्या मुद्यांवरून सातत्याने धमकी दिल्याचंही पाहायला मिळालं होतं.

यातच काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी नाटो देशांना एक पत्र लिहून चीन जोपर्यंत रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवणार नाही आणि युक्रेन-रशिया युद्ध जो पर्यंत थांबत नाही तोपर्यंत चीनवर ५० किंवा १०० टक्के टॅरिफ आकारण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. या सर्व घडामोडींवरून आता रशियाची प्रतिक्रिया समोर आली आहे. अमेरिकेचं टॅरिफ युद्ध आता चालणार नाही, भारत आणि चीन अशा धमक्यांपुढे झुकणार नाही, अशा शब्दांत रशियाने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा इशारा दिला आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी अमेरिकेच्या टॅरिफच्या धमक्यांबाबत सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी म्हटलं की, भारत आणि चीन सारखे प्राचीन संस्कृती असलेले देश अशा अल्टिमेटमसमोर झुकणार नाहीत. ‘मला जे आवडत नाही ते करणे थांबवा, नाहीतर मी तुमच्यावर टॅरिफ लावणार’ अशा प्रकारची अमेरिकेची भारत आणि चीनबाबतची भाषा पूर्णपणे चुकीची आहे. यामुळे तुमचं (अमेरिकेचं) कामही होणार नाही”, असं मंत्री सर्गेई लावरोव यांनी म्हटलं. तसेच अमेरिकेला इशाराही दिला की त्यांनी निवडलेल्या दृष्टिकोनाशी संबंधित नैतिक आणि राजकीय विरोध आहे.

‘भारत आणि चीनने दबाव नाही तर स्वतःचं हित निवडलं’

अमेरिकेकडून वारंवार धमक्या येत असतानाही भारत आणि चीनने त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रीय हितांवर आधारित धोरणांना प्राधान्य दिलं. वॉशिंग्टनच्या दबाव मोहिमांचा लक्ष्यित देशांवर आर्थिक परिणाम होतो. त्यांना नवीन बाजारपेठा शोधाव्या लागतात, नवीन ऊर्जा स्रोत शोधावे लागतात आणि जास्त किंमत मोजावी लागते. मात्र, त्यापेक्षाही जास्त महत्वाचं म्हणजे या धोरणामुळे नैतिक आणि राजकीय प्रतिक्रिया निर्माण होतात”, असंही सर्गेई लावरोव यांनी म्हटलं.

रशियावरील निर्बंधांच्या इशाऱ्याबाबत सर्गेई लावरोव काय म्हणाले?

“खरं सांगायचं तर मला कोणतीही समस्या दिसत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही अभूतपूर्व असे निर्बंध लादण्यात आले होते. पश्चिमेकडील देशांनी हे निर्बंध लादले तेव्हाच्या परिस्थितीवरून आम्ही निष्कर्ष काढू लागलो आहोत. नंतर, जो बायडेन यांच्या कार्यकाळात कोणत्याही राजनैतिक प्रयत्नांना पर्याय म्हणून निर्बंधांचा वापर करण्यात आला होता.”